Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा ‘पाऊस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election 4660 candidature applications for Gram Panchayats akola

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा ‘पाऊस’

अकोला : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत पार पडली. यावेळी सरपंचाच्या २६६ पदांसाठी एक हजार ३२६ तर सदस्याच्या २ हजार ७४ जागांसाठी ४ हजार ६६० अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. सदर अर्जांची छाननी सोमवार (ता. ५) करण्यात येणार आहे. परंतु तत्पुर्वीच राजकीय पक्षांकडून मात्र सरपंच पदासाठी दमदार उमेदवारांचा शोध घेवून उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात थंडीच्या दिवसातच वातावरणात राजकीय गर्मी आल्याचे दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

सदर ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान सरपंच व सदस्य पदांसाठी पाच हजार ९८५ अर्ज प्राप्त झाल्याने ईच्छुकांची भाऊगर्दी अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

ऑफलाईनमुळे वाढली संख्या

२६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवशी २ डिसेंबर असल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली. त्यासोबतच सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुट सुद्धा दिली. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.

बुधवारी स्पष्ट होणार लढतींचे चित्र

ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी (ता. ५) करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान १८ डिसेंबर, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर राेजी हाेणार आहे.

असे आहेत प्राप्त उमेदवारी अर्ज

तालुका सरपंच सदस्य

तेल्हारा ९९ ४२३

अकाेट २१८ ९०८

मूर्तिजापूर २१३ ७२०

अकाेला २४६ ८८७

बाळापूर १३९ ४२०

बार्शीटाकळी २५४ ७८५

पातूर १५७ ५१७

एकूण १३२६ ४६६०

अशी आहे रिक्त जागांची संख्या

तालुका सरपंच सदस्य

तेल्हारा २३ १९१

अकाेट ३७ ३०५

मूर्तिजापूर ५१ ३९१

अकाेला ५४ ४०४

बाळापूर २६ १९८

बार्शीटाकळी ४७ ३५९

पातूर २८ २२६

एकूण २६६ २०७४