कोविड-19 बाधितांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्या पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

विवेक मेतकर 
Friday, 16 October 2020

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

अकोला :  जिल्ह्यात एकदम वाढलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख गेल्या आठवड्यापासून कमी होत आहे, ही निश्चितच चांगली व दिलासादायक बाब आहे. मात्र आता सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवून बाधितांची संख्या पुन्हा वाढणार नाही याची खबरदारी घ्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

हे ही वाचा : वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्याच्या उपाययोजना करा

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

हे ही वाचा : पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना विक्री व्यवस्थांचे बळकटीकरण करा

यावेळी जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा उत्तम असून त्याबद्दल ना. कडू यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा टप्पा दोनदा आला असून रुग्ण कमी होणे आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा वाढणे याबाबत अभ्यास करुन त्याची कारणमिमांसा करावी. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचेही अशाच प्रकारे कारणे शोधण्यात यावी व ती कारणे दूर करावीत. 

तसेच मृत व्यक्तींचे सामाजिक आर्थिक स्थितीबाबतचे सर्वेक्षण करुन त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच या कारणांचा अभ्यास करुन आगामी काळात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. यावेळी कोरोना उपचार सुविधांची उपलब्धता, बेड्स उपलब्धता, औषधे, ऑक्सिजन उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bachchu Kadu said that care should be taken not to increase the number of corona patients