पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना विक्री व्यवस्थांचे बळकटीकरण करा

विवेक मेतकर 
Friday, 16 October 2020

ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेचा आढावा घेण्यात आला.

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्योग व्यवसायांना चालना देत असताना उत्पादित होणाऱ्या मालाच्या विक्रीच्या व्यवस्थांचे बळकटीकरण करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे दिले.

हे ही वाचा : वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्याच्या उपाययोजना करा

ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी योजनेच्या प्रगतीविषयी माहिती सादर केली. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेत सहभागी झालेल्या मोरगाव भाकरे, गायगाव येथे हातमाग उद्योग, राजनापूर खिनखिणी, पातूर येथे अगरबत्ती उद्योग, अडगाव बु येथे  झाडू खराटा निर्मिती, बोरगाव मंजू, शेलापूर, कान्हेरी सरप येथे रेडीमेड गारमेंट उद्योग असे एकूण १९० प्रकरणे प्रस्तावित असून त्यातील ७५ प्रकरणे मंजूर झाले आहेत. उर्वरित प्रकरणे हे  मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

हे ही वाचा : महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

यासोबतच मधमाशी पालन, सोलर चरखे यासारखे उद्योगही स्थापन्याबाबत चालना देण्यात येत आहे. या उद्योगांमधून तयार होणारा माल विक्री व्हावा, यासाठी विक्री व्यवस्थांचे बळकटीकरण करा, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bachchu Kadu said that strengthen the sales system of Udyami Gram Yojana