हॅल्लो जिल्हाधिकारी महोदय, मी अकोला नाका रस्ता बोलतोय! खाचखळग्याचे प्रारब्ध बदणार कधी?

राम चौधरी
Wednesday, 12 August 2020

 जिल्हाधिकारी महोदय, मी गरीब बापडा पाटणी चौक ते अकोला नाका रस्ता बोलतोय, तुमची भेट घ्यावी आपबिती सांगावी अशी इच्छा खूप होती; मात्र माझ्यासारख्या चिखलाने बरबटलेल्याला कोण तुमच्यापर्यंत घेवून येणार, म्हणून वेदना असह्य झाल्याने आज तुमच्याशीच बोलतोय.

वाशीम :  जिल्हाधिकारी महोदय, मी गरीब बापडा पाटणी चौक ते अकोला नाका रस्ता बोलतोय, तुमची भेट घ्यावी आपबिती सांगावी अशी इच्छा खूप होती; मात्र माझ्यासारख्या चिखलाने बरबटलेल्याला कोण तुमच्यापर्यंत घेवून येणार, म्हणून वेदना असह्य झाल्याने आज तुमच्याशीच बोलतोय.

महोदय तसा मी शहरातील महत्त्वाचा रस्ता बर का! बालासाहेबांच्या आणि राजे वाकाटकाच्या राजधानीचा राजमार्गच म्हणा हव तर. या रस्त्यावरूनच शहरात प्रवेश करता येतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याच रस्त्यावर तुमचे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे मिनीमंत्रालय, गोरगरीबांचे जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, आणि राजस्थान महाविद्यालय. परंतु, महोदय गेल्या पाच वर्षांपासून माझी वेदना कोणी समजूनच घेत नाही.

पाच वर्षांपूर्वी माझ्या कडेला गिट्टी पडली, वाटल आतातरी दिवस पालटतील. परंतु, दिवस पालटायचे दूरच तेव्हापासून माझे दिवसच फिरले. थातुरमातुर गिट्टी अंथरली, माती की मुरूम अंथरला, डांबराच्या नावाखाली काहीतरी काळेबेरे टाकले गेले. एका सद्ग्रहस्थाने माझी घालमेल पाहून तक्रारही केली.

Akola | eSakal

मात्र, राजश्रयाच्या छत्रछायेत कमीशनची थैली सांभाळणाऱ्या कंत्राटदाराला चक्क गुणनियंत्रक विभागाने क्लिनचीट दिली. रडलो, कुढलो कोणी सुज्ञ नागरिक माझी कड घेईल असे वाटत होते. परंतु, ‘राजा बोले दल हाले’ या न्यायाने कंत्राटदार वाकूल्या दाखवून निघून गेला.

तो गेल्याबरोबर माझ्यावरच्या डांबर नाव दिलेल्या रसायनाने विद्रोह पुकारला, गिट्टीने साथ सोडली, मुरूमाने आपल्या मूळ मातीचे रंग दाखविण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मी असाच कन्हत आहे. या रस्त्यावरूनच शाळेत जाणारे चिमुकले धडपडून रक्तबंबाळ होतात, तर कधी माझे वैभव पाहिलेले ज्येष्ठ नागरिक माझ्याच नावाने शिव्याशाप देतात. सांगा यात माझा काय दोष?

Akola | eSakal

आधीच उपेक्षा त्यात वाढला दाह
जिल्हाधिकारी महोदय, मी खाचखळग्याचा असलो तरी शितलता देत होतो. मात्र दोन वर्षांपूर्वी माझा पुन्हा मेकओव्हर करण्याची टुम निघाली. माझ्या अंगाखांद्यावर नटलेली शंभर वर्षाची जुनी हिरवीगार झाडे शहिद केली गेली. तेव्हापासून जीव तळमळतो, पण इलाज नाही.
.
एकदा न्यायाचे तराजू उचला
महोदय, लोकशाहीत आपण जिल्ह्याचे राजे आहात, न्याय तुम्हालाच द्यावा लागणार. पाच वर्षांपूर्वीचा फार्स, गुणनियंत्रक विभागाने दिलेली क्लिनचीट, कंत्राटदाराने केलेली बनवाबनवी याची एकदा शहनिशा कराच. मला उद्ध्वस्त करणाऱ्यांना शासन करणे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. न्याय मिळाला तर शहरातील इतर रस्त्यांचे दुर्दवाचे दशावतार तरी थांबतील.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hello Collector, I am talking about Akola Naka Road! When will the fate of Khachakhalya change?