
अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?
बुलडाणा: मेहकर मधून बाहेर पडताना गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो. त्याबद्दल एक आख्यायीका आहे. कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. घुंगरांचे श्रृंगाररस पूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ. तिथे जळणारा नंदादीप देवळात न जाता मी सात मजले चढून इथूनच बघेन असा तिचा तोरा होता. त्यासाठी तिने भव्य महाल बांधून घेतला. गर्वात ती एका रात्री एकावर एक मजले चढत गेली आणि सातवा मजला चढली मात्र, देवीच्या कोपाने शीळा होऊन तिथेच खाली कोसळली. तिचे चैतन्य लोपले. अजूनही तिथे रात्री घुंगराचे आवाज ऐकू येतात असे म्हणतात. अशा अनेक आख्यायिका या महालाच्या परिसरात अजूनही ऐकावयास मिळतात. (Historic Kanchani Palace at Buldana Mehkar)

कोण होती कंचनी?
सौन्दर्य शापित असावं बहुतेक? पाबळ-मस्तानी वगैरे वाचलं की आपल्याला आठवण होते ती मेहेकरच्या भागातील “कंचनी महालची” कंचनी-प्राचीन रहस्य कथेची स्वामीनी, अहंकार आणि सौन्दर्याचा ताठा मिरवणारी, दुरच्या जुन्या काळी एक गणिका होती. मनमोहक कुशल, सुवेश धारीनी, कित्येक धनिकांच्या, एका राजसपुत्राची हद्यहरीणी होती. कंचनीनेच हा महाल बांधलेला होता आणि तिच शिळा म्हणून शापीत तिथेच पडली आहे. असं म्हणतात- “पुनव येताच वासनामय ती दगडामघुन महालाभोवती चांदण्याखालती तेच ते फेर ती घेते, तिच्या घुगरांचा आवाज आसमंतात घुमत राहतो…

दोन मजली महालावर गर्वाने बांधले पाच मजले
आख्यायिका आहे की, एका मधुर, राजसवाणी रात्री ला महालाच्या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या पैनगंगेतुन ती प्रदोष पुजेकरीता माथ्यावर कलश घेऊन न्हाऊन निघाली होती. आधीच लावण्यवती अन् ओघळणारं पाणी त्यामुळे सगळ्या वरच तिचा कैफ. ….त्यारात्री एक विशीचा राजपुत्र सगळे निघून गेल्यावर तिला म्हणाला, “सोबत जाऊन लोणार तळ्यात बघु या देवीचा दिवा”ती मिश्कीलपणे हसून म्हणाली, “बांधुन महाल, येथूनच पाहील तो दिवा! !”मुळात दोनच मजली असलेल्या महालावर तिने गर्वाने पाच मजले बांधले. तिला वाटले होते की ऊंचात जाऊन तारांन्या ती वेचेल, जवळच असलेल्या सप्तर्षी समोर अंगविक्षेप करीत मिरविणं, तेथूनच कमळजेचा दिपक पाहीन अश्या भ्रमात, तोर्यात ती सहा मजले चढून गेली पण देवीच्या कोपाने ती शिळा होऊन खाली कोसळली.

येथे नांदत होते ऐश्वर्य
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरच्या ऐतिहासिक वारशात भर घालणारी वास्तू म्हणजे कंचनीचा महाल. विविध मनोरंजक कथा, अफवांचे पेव या महालाबद्दल फुटले आहे. त्यामुळे या वास्तूबद्दल सुरूवातीपासूनच कुतूहल राहिले आहे. कंचनी नावाची एक नर्तकी येथे वास्तव्यास होती, असे सांगण्यात येत असले तरी त्याला ऐतिहासिक संदर्भ नाहीत. मेहकरच्या उत्तरेकडे उंच टेकडीवर एक पडका महाल आहे. दोन मजली असलेल्या या महालाची सध्या भग्नावस्था झाली आहे. दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या तुटल्या असून, भिंतींमधील विटा बाहेर निघत आहेत. मात्र, या महालाकडे पाहल्यावर कधीकाळी येथे ऐश्वर्य नांदत होते, याची प्रचिती येते. लाल नारंगी विटांनी रचलेला कंचनीचा महाल कधीकाळी रात्रीच्या एकांतात संगीतमय स्वरांनी भारावून जात होता. कंचनी नावाची एक नर्तकी येथे राहत होती, असे सांगण्यात येते.

पुरातत्व विभागाने संरक्षित करावे
सध्या महालाचे अडीच मजल्याचे अवशेष शिल्लक आहेत. कांचनीचा महाल संरक्षित वस्तू व्हावे, अशी मागणी इतिहासप्रेमींची असूनही पुरातत्त्व विभागाकडून दाखल घेण्यात आलेली नाही. शासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. मेहकरचे वैभव, शान असलेली ही वास्तू टिकावी, परिसर सुशोभित व्हावा, संरक्षक भिंत या वास्तू भोवती शासनाने बांधावी अशी नागरिकांची मागणी आहे. मराठीचे प्रसिद्ध कवी मेहकरचे ना. घं. देशपांडे यांनी कंचनीचा महाल ये दीर्घकाव्य लिहिले व याच शीर्षकाचा कविता संग्रह प्रसिद्ध असून, तो खूप गाजला आहे.

ना.घं. देशपांडेच्या कवितेत कंचनी
" अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
Historic Kanchani Palace at Buldana Mehkar