Increase in curfew : संचारबंदीमध्ये पुन्हा दोन दिवसांची वाढ; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

curfew

संचारबंदीमध्ये पुन्हा दोन दिवसांची वाढ; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न

अकोला : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी शहरातील संचारबंदीच्या कालावधीमध्ये दोन दिवसांची वाढ केली आहे. आता शहरातील संचारबंदी २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत वाढली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वैद्यकीय कारण वगळता इतर कारणांसाठी बाहेर फिरणाऱ्यांवर मनाई करण्यात आली आहे.

त्रिपुरा येथील घटनेनंतर नजीकच्या अमरावती शहरासह अकोट तालुक्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून अकोला शहरात सुद्धा १७ नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजतापासून ते १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना सादर केला होता.

हेही वाचा: चीनने दिलेल्या आश्वासनानंतर TikTok Ban हटवला; चौथ्यांदा निर्णय

१९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजता पासून ते २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अकोला शहरासाठी सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडावा यासाठी शहरातील संचारबंदीमध्ये पुन्हा दोन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

आता २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजतापसून ते २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरू राहतील, असा उल्लेख उपविभागीय अधिकारी डॉ. अपार यांच्या आदेशात करण्यात आला आहे.

हेही वाचा: बीजिंग २०२२ हिवाळी ऑलिम्पिकवर राजनीतिक बहिष्कार! चीन म्हणाला...

काय आहे आदेशात?

  • संचारबंदीच्या कालावधीत कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्मांच्या दोन गटांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करता येणार नाहीत किंवा अफवा पसरविता येणार नाहीत.

  • जातीय भावना भडकावणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारित करता येणार नाहीत.

  • आक्षेपार्ह पोस्ट टाकणार येणार नाहीत व समाज माध्यमांचा गैरवापर करता येणार नाही.

  • कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.

  • निवडणूक प्रचारासंदर्भात काही कार्यक्रम असल्यास या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.

  • सदर कालावधीत कोविड १९ लसीकरणाचे सत्र पूर्ण क्षमतेते सुरू राहील.

  • सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भादंविच्या १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल.

loading image
go to top