
हिवरखेड येथे कोंडवाडा परिसरात महावितरणचे रोहित्र असून काही महिन्यांपूर्वी या रोहित्रावरून एका नामांकित मोबाईल टॉवरला विद्युत पुरवठा देण्यात आला.
हिवरखेड (अकोला) : 'तो' येताच 'ती' का निघून जाते ? आणि 'ती' त्याच्यासोबत नांदायला तयार का नाही ? असा लाख मोलाचा प्रश्न हिवरखेडमधील नागरिकांना पडला आहे. एवढेच नव्हे तर ती त्याच्यासोबत नांदत नसल्याने इतरांचे सुखी संसार सुद्धा धोक्यात आले असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : अकोला येथील नकली नोटांचे धागेदोरे शेगावात; एका पत्रकारासह चौघे ताब्यात
हिवरखेड येथे कोंडवाडा परिसरात महावितरणचे रोहित्र असून काही महिन्यांपूर्वी या रोहित्रावरून एका नामांकित मोबाईल टॉवरला विद्युत पुरवठा देण्यात आला. त्यावेळेपासून या रोहित्रावरून वीज पुरवठा असणाऱ्या हजारो नागरिकांच्या मागे 'शनी दशा' सुरू झाल्याची प्रचिती येत आहे. विविध दिवशी वेगवेगळ्या पाईपलाईनद्वारे परिसरात पाणीपुरवठा होत असल्याने कोणत्याही पाईपलाईनचे नळ आले की कोंडवाडा रोहित्राची लाईन जाणे हे रोजचेच रडगाणे झालेले आहे.
नळ येताच लाईन जात असल्याने पाण्याच्या मोटारी बंद पडतात. त्यामुळे नळापासून छतावरील टाकीपर्यंत वर पाणी कसे चढवावे, हा यक्ष प्रश्न नागरिकांना पडतो. आणि ही एक दिवसाची समस्या नसून नित्याचीच डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे पाणी भरताना सर्वांचीच दमछाक होत आहे. बऱ्याच घरात पुरुष मंडळी पाणी भरण्यास वेळ देऊ शकत नसल्याने सर्व आटापिटा महिलांनाच करावा लागत आहे. वीज नळासोबत नांदत नसल्याने सुखी संसार करणाऱ्या बऱ्याच महिला पुरुषांमध्ये किरकोळ भांडणे सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे.
हे ही वाचा : अकोल्यात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
जाणकार सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवाडा रोहित्रावर लोड जास्त झाल्याने येथील अतिरिक्त भार इतर रोहित्रावर वळविणे आवश्यक आहे. लोड वाढल्यामुळे वारंवार लाईन तर जात आहे. सोबतच रोहित्राची वायरिंगसुद्धा वारंवार जळत असून उच्च दाबाच्या तारा उघड्या पडत असल्याने लहान मुलांच्या जीवित हानीची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे.
लोड टेस्टिंग मशीन आणून येथील लोड डिव्हाईड करणे आवश्यक आहे. सोबतच काही ठिकाणी कट पॉईंट लावणे गरजेचे आहे. परंतु महावितरणाने आतापर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत. लवकरच महावितरणाने कोंडवाडा रोहित्राची दुरुस्ती करून लोड कमी करून कायम स्वरूपी उपाययोजना करून विजेला नळासोबत सुखी संसार करायला लावला नाही तर इतरांचे सुखी संसार संकटात येऊ शकतात एवढे मात्र खरे.
हिवरखेडचे महावितरण अभियंता कुमार साहेब म्हणाले, नळाच्या वेळीच लाईन जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची आम्हाला जाणीव आहे. कोंडवाडा डीपीवरील लोड कमी करण्यासाठी नियोजन केले असून कंत्राटदाराला काम करण्यास सांगितले आहे. येत्या दोन-चार दिवसातच समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले