अकोला येथील नकली नोटांचे धागेदोरे शेगावात; एका पत्रकारासह चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

या झडतीमध्ये अकोला पोलीसांनी शेगाव येथील पत्रकार जावेद शाह याच्यासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. झडतीमध्ये नकली नोटा मिळून आल्या अथवा नाही, याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

अकोला : येथील ५०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अकोला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सहा दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तपासा दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे संत नगरी शेगावात असल्याची माहिती समोर आली. यामुळे अकोला पोलिसांनी शेगाव येथील चार घरांची झडती घेतली. या झडतीमध्ये अकोला पोलिसांनी शेगाव येथील पत्रकार जावेद शाह याच्यासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. झडतीमध्ये नकली नोटा मिळून आल्या अथवा नाही, याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

काय आहे प्रकरण

११ नोव्हेंबर रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेस गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की, एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केटमध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सागर हटवार यांचे तपास पथकाने अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केटमध्ये सापळा रचून आरोपी अबरार खान हयात खान (वय २७ वर्ष रा. नायगांव, अकोट फैल) यास पाचशे रु. छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगून त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीमधून पाचशे रु. छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या तीन बनावट चलनी नोटा एकूण दर्शनी किंमत एक हजार रु. च्या जप्त करण्यात आल्या. तसेच त्याचे नायगांव, अकोट फैल येथील राहते घराची घरझडती घेऊन पाचशे रु. छापील किंमतीच्या ५४ बनावट चलनी नोटा एकूण दर्शनी किंमत २७,००० रु.च्या जप्त करण्यात आल्या होत्या. 

हे ही वाचा : अकोल्यात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

आरोपी अबरार खान हयात खान यास प्राथमिक विचारपूस केली असता, त्याने या नोटा त्याचे जानोरी, शेगांव, जि. बुलडाणा येथील साळा शेख, राजिक शेख चांद याचे जवळून आणल्याचे सांगितले. यावरुन ग्राम जानोरी, (ता. शेगांव, जि. बुलडाणा) येथे जाऊन शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेऊन त्याचे घरझडती मधून ५०० रु. छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या २२ बनावट चलनी नोटा एकूण दर्शनी किंमत ११,००० रु. च्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शेख राजिक शेख चांद, रा. जानोरी, ता. शेगांव, जि. बुलडाणा यास प्राथमिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की, शेगांव येथील राहणा-या एका इसमाकडून २५,००० रु. चलनी नोटा देऊन ५०० रु. छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकूण दर्शनी किंमत ३९,५०० रु. च्या घेतल्या होत्या. याप्रमाणे आरोपी अबरार खान हयात खान आणि शेख राजिक शेख चांद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५०० रु. छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकूण दर्शनी किंमत ३९,५०० रु. च्या पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपी तथा जप्त बनावट चलनी नोटा पुढील तपासकामी अकोट फैल पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have arrested a man in Akola for issuing counterfeit notes