अकोला : मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात अकोल्यात काढली रॅली; हजारोंच्या संख्येने समर्थक एकवटले
Shiv Sena agitation
Shiv Sena agitation

अकोला : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना प्रमुख मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आमदार नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी दुपारी अकोला शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. काळ संकटाचा असला तरी आमचा वारसा संघर्षाचा आहे, अशा आशयाचे फलक रॅलीच्या मार्गावर झळकले होते.

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोमवारी अकोला जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक आक्रमक होत रस्त्‍यावर उतरले. जुने शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. अडीच ते तीन हजार शिवसैनिकांनी रॅलीत सहभाग घेतला. घोषणाबाजी करीत निघालेल्या या रॅलीचा समारोप महाराणा प्रताप चाैकात झाला. या रॅलीत आमदार नितीन देशमुख, सहाय्यक संपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, विजय मालोकार, राजेश मिश्रा, प्रदीप गुरुखुद्दे, योगेश अग्रवाल, अतुल पवणीकर, नितीन मिश्रा, राहुल कराळे, संतोष अनासने, तरूण बगेरे, गोपाल भटकर, अप्पू तिडके, अनिरुद्ध देशमुख, डॉ. प्रशांत अढाऊ, गजानन चव्हाण, मंजुषा शेळके, शशिकांत चोपडे, सुनिता श्रीवास आदींसह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.

बंडखोरांना शिवसैनिक जागा दाखवून देतील- आ. देशमुख

रॅलीचा समारोप प्रसंगी आमदार नितीन देशमुख यांनी रॅलीत सहभागी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. भाजप व शिवसेनेतील बंडोकर मंत्री व आमदारांवर त्यांनी हल्लाबोल करीत मतदार व शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले. अडी वर्षांपूर्वी शपथ घेताना याच मंत्र्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटली होती. ज्या भाजपने शिवसेना संपविण्यासाठी युती तोडली तीच भाजप या बंडखोरांना आता जवळची कशी वाटते, असा प्रश्नही आमदार देशमुख यांनी केला.

भाजपसोबत शिवसेना सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या विरोधात राजीनामा दिली होता, हे विसरले का? बंदडखोरांमध्ये हिंमत असल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उतरून दाखवावे, असेही ते म्हणाले. शिवसैनिक सदैव बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच राहिल, उद्धव ठाकरे यांनाच्या पाठीशी सच्चा शिवसैनिक ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

बंदोबस्तात पोलिस यंत्रणा व्यस्त

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मार्गांवर लावण्यात आला होता. या बंदोबस्तामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी-एक, पोलिस निरीक्षक-पाच ,सहाय्यक पोलिस निरीक्षक दोन, उपनिरीक्षक-एक आणि ७६ पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा होता. जुने शहर, सिटी कोतवाली, डाबकी रोड व रामदापेठ पोलिस स्टेशनसह शहर वाहतुक शाखेची पोलिस बंदोबस्तासाठी व्यस्त झाली होती.

या मार्गावर निघाली रॅली

शिवसेनेच्या रॅलीला दुपारी १.१५ वाजता जुने शहरातील राजेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येत शिवसैनिक घोषणाबाजी करीत जयहिंद चाैक, महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली), जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चाैक, गांधी राेड या मार्गाने महाराणा प्रताप चाैकात पोहोचले. तेथे नेत्यांच्या भाषणांनी रॅलीचा समारोप झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com