esakal | Washim : मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांचा कस!
sakal

बोलून बातमी शोधा

मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांचा कस!

Washim : मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांचा कस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्हा परिषदेच्या १४ रिक्त जागांची पोटनिवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. या निवडणुकीत गमावलेल्या जागा राखण्याची राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार असून, गणित बिघडले तर, जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन धोक्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चच्या आदेशाने रद्दबातल ठरविल्याने वाशीम जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील १४ सदस्य अपात्र घोषित करण्यात आले होते.

न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकाही सर्वोच्च न्यायालयात टिकल्या नाहीत. न्यायालयाने या जागा सर्वसाधारण प्रवर्गात निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असताना, निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३ जागा कमावाव्या लागणार आहेत तर, वंचित बहुजन आघाडीला चार जागा, शिवसेना व काँग्रेस प्रत्येकी १ जागा, भाजप २, जनविकास आघाडी २ व एक अपक्ष जागा राखण्याचे आव्हान या राजकीय पक्षांसमोर आहे.

यातील शिवसेना- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीसह आघाडीकडून राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. शोभा गावंडे सभापती होत्या. तर, शिवसेनेचे विजय खानझोडे सभापती होते. हेच सत्तासंतुलन कायम ठेवण्यासाठी विद्यमान जागा या पक्षांना राखणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

लढाई होणार प्रतिष्ठेची

या पोटनिवडणुकीवर जिल्हा परिषदेतील भावी राजकीय सत्तासंतुलन अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे. शिवसेनेचे सभापती विजय खानझोडे, शोभा गावंडे यांना पुन्हा निवडणूक रिंगणातून विजयी व्हावे लागणार आहे.

सगळेच पक्ष ‘स्व’बळावर

या पोटनिवडणुकीत प्रारंभी महाविकास आघाडीबाबत चर्चा होती. मात्र, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीसोबत जाण्याची घोषणा केली आहे .त्यामुळे रिसोड- मालेगाव तालुक्यातील जागा महत्त्वाच्या ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या समर्थकाना अपक्ष निवडणूक रिंगणात उतरविले असल्याने ही राजकीय लढाई अटीतटीची राहणार आहे.

loading image
go to top