Akola Crime News : सहा जणांना दुहेरी जन्मठेप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Sharma murder case Murtijapur Double life imprisonment for six people

Akola Crime News : सहा जणांना दुहेरी जन्मठेप!

अकोला : मूर्तिजापूर येथे सन २०१४ मध्ये घडलेल्या मनोज शर्मा हत्याकांडातील सहा आरोपींना भादंवि कलम ३०२ आणि ३०७ नुसार न्यायालयाने दोषी ठरविले होते. या सहाही जणांना सोमवार, ता. २७ मार्च रोजी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सोबतच सर्वांना विविध गुन्ह्यात एकत्रित १.५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये बबन वामनराव शितोळे, गणेश वसंतराव शितोळे, नामदेव बबन शितोळे, कपिल रतन शितोळे, प्रमोद शेषराव चव्हाण आणि पंकज निलकंठ डोंगरदिवे यांचा समावेश आहे. विजय अनंत लोकरे, मोहम्मद रिजवान शेख इकबाल यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले होते.

मूर्तिजापूर येथील अग्रसेन चौकात ता. ४ जून २०१४ रोजी आठ जणांनी मिळून माजी नगरसेवक मनोज शर्मावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यावेळी मध्यस्थी करणारे राम जोशी या घटनेत जखमी झाले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज बंसीलाल शर्मा याला पोलिसांनी उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राम मोहनलाल जोशी यांच्या तक्रारीवरून आठ आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७, २०१, २१२, १४७, १४८, १४९ व आर्म ॲक्टच्या कलम चार, २५ नुसार गुन्हा दाखल केला होता.

या घटनेचा तपास तत्कालीन परिवीक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारकी प्रवीण मुंढे, पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे, गजानन पघडन यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधीस सुनील पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सहा आरोपींना भादंवि कलम ३०२ नुसार गुरुवारी दोषी ठरविण्यात आले.

न्यायालयातील सुनावणी दरम्यान मूर्तिजापूर शहर पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाची बाजू ॲड. आर. आर. देशपाडे यांनी मांडली. न्यायालयाने मृतकाचे कुटुंब व जखमीला आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव करण्याचा आदेशही दिला आहे.

या कलमांनुसार ठरविले दोषी

मनोज शर्मा हत्याकांडतील सहा जणांना भादंवि कलम ३०२ नुसार आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सोबतच प्रत्येक्षी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. कलम ३०७ नुसार आजन्म कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. कलम १४८ नुसार प्रत्येकी दोन वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :Akolacrime