Akola Crime - लहान मुलांना पळवून नेणाऱ्यास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

लहान मुलांना पळवून नेणे व अल्पवयिन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
Court
Courtesakal

अकोला - वर्धा जिल्ह्यातील लादगड येथील सराईत गुन्हेगार सुधाकर उर्फ शंकर उर्फ चंद्र्या जंगलजी उईके (३८) या गुरुवारी (ता. ३०) याला अतिरिक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा शिक्षा सुनावली. लहान मुलांना पळवून नेणे व अल्पवयिन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले.

सुधाकर उईके हा शेगाव येथे कचरा गोळा करणे व भिक मागत होता. कोविड लॉकडाउन काळात ता.२२ ऑगस्ट २०२० रोजी तो एका १५ वर्षीय पीडितेसोबत चाईल्ड हेल्पलाईनचे समन्वयक पद्माकर सदाशिव व त्यांचे चमूस अकोला येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. आरोपीला ताब्यात घेवून पीडितेस बालकल्याण समिती समोर हजर केले.

वैद्यकीय तपासणी पीडिता १८ ते १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे आढळळे. त्यानंतर पो.उप.निरिक्षक तानाजी बहिरम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकडाउनमुळे वैद्यकीय अहवाल व इतर प्राथमिक अहवाल अशिरा प्राप्त झाले. त्या दरम्यान चौकशीकरिता ताब्यात घेतलेला आरोपी फरार झाला. पोलिसांनी त्याला वर्धा येथून पुन्हा ताब्यात घेतले व अटक केली.

तत्कालिन तपास अधिकारी किरण साळवे यांनी वि. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तपासात त्यांना पी. एस. आय. सुनील भिसे व ए.पी.आय. आर. पी. जाधव व इतर सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली. पी. एस. आय. तानाजी बहिरम यांनी सुध्दा तपासामध्ये सहकार्य केले. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील किरण खोत यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी पो.कॉ. प्रिया गजानन शेंगोकार व रेल्वे पोलिस पैरवी हे. कॉ. अनिल खोडके यांनी सहकार्य केले.

रेल्वेतून उतरली अन् फसली

पोलिस तपासानुसार पीडिता ही घटनेपासून मागील दीड वर्षे आरोपी सोबत शेगाव येथे होती. पीडिता ही सैलानी येथे रेल्वेने तिचे बहिणीसोबत जात असताना शेगाव स्टेशनवर गाडीतून खाली उतरली व गाडी सुरू झाल्याने पुन्हा गाडीत चढू शकली नाही. नंतर आरोपीने तिला गाठले व विश्वासात घेऊन फुस लाऊन सोबत ठेवले. दोघेही भिक मागत होते. दरम्यान आरोपीने अल्पवयीन पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली.

डीएनए चाचणीचा अहवाल ठरला महत्त्वपूर्ण

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यात डीएनए चाचणीचा अहवाल महत्त्वाचा ठरला. पीडिता ही गोंदिया जिल्ह्यात तिची बहिण व जावई यांच्या घरी गेली व तेथे तिला बाळ झाले. हे बाळ गैरकायदेशीर मार्गाने नातेवाईकांच्या मदतीने दत्तक देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पीडितेस व बाळास शोधून वैद्यकीय तपासणीसाठी अकोला येथे आणले.

डी.एन.ए. चाचणीकरिता रक्त नमुने घेतले व बाळास कायदेशीर मार्गाने शिशू गृहाचे स्वाधिन केले. न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा अमरावती येथे चाचणी करून अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार आरोपी व पीडिता हे त्या नवजात बालकाचे जैविक माता पिता असल्याचे सिद्ध झाले. सहाय्यक रासायनिक विश्लेषक डी. एन. ए. विभाग, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, अमरावती सिध्दार्थ रणसिंग मोरे यांची साक्ष याबाबत महत्त्वाची ठरली.

पीडिता साक्ष देण्यास गैरहजर

साक्षपुराव्या दरम्यान वारंवार प्रयत्न करुनही पीडिता साक्ष देण्याकरिता मिळून आली नाही. पीडितेच्या साक्ष पुराव्या शिवाय अन्य साक्ष पुराव्याचे आधारे आरोपीस दोषी ठरविण्यात आले. पीडितेच्या जन्मतारखेबाबत कोणतेही कागदपत्री पुरावे उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीचे आधारे (ऑसीफिकेशन टेस्ट) पीडितेचे वय १५ वर्षे सहा महिने असल्याचे वैद्यकीय अहवाला नुसार निष्पन्न झाले. त्या आधारे पीडिता ही गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन बालिका होती हे सिध्द झाले.

मुले पळविल्याबद्दल झाली होती शिक्षा

- आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.

- मुले पळविण्याच्या गुन्ह्यात आर्वी (जि. वर्धा) न्यायालयाने अडीच वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली.

- आरोपीने त्याचे नातेवाईकांची मुले पळविण्याचा प्रयत्न केला होता.

- बोरगाव गोंडी व जामखुटा ( ता. आर्वी जि. वर्धा) येथील साक्षीदारांनी न्यायालया समक्ष साक्ष दिली.

अशी ठोठावली शिक्षा

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी सुधाकर उर्फ शंकर उर्फ चंद्र्या जंगलुजी उईके यास भांदवि व पोस्कोच्या विविध कलमा अन्वये शिक्षा ठोठावली व एकूण ३० हजार रुपये दंड आकारला. सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत. दंड ठोठावण्यात आलेली एकूण रक्कम ३० हजार रुपये आरोपीने जमा केल्यास सदर रक्कम ही प्रकरणातील पीडिता सापडू न शकल्यामुळे तिचे बाळास देण्यात यावी व त्याबाबत संबंधितांनी ती वयस्क होईपर्यंत रक्कम तिचे नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवण्यात यावी, असे आदेशित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com