काँग्रेस, शिवसेनेचे तुर्तास ‘एकला चलो रे’

महानगरपालिका निवडणूक ः महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची होणार कोंडी
municipal elections Congress and Shiv Sena two parties Mahavikas Aghadi Independent election ncp akola
municipal elections Congress and Shiv Sena two parties Mahavikas Aghadi Independent election ncp akolasakal

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी तुर्तास स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षही प्रथमच अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मनपा निवडणुकीत चुरस बघावयास मिळणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला थोपविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अपक्षांसोबत घेवून महाविकास आघाडीची स्थापन केली आणि राज्यातील सत्ता मिळविली. मात्र, याच महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘बिघाडी’ होताना दिसून आले. अकोला जिल्ह्यात होत असलेल्या हातरूण या जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीतही शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. हीच भूमिका महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रहारची ‘एन्ट्री’ ठरू शकते धक्कादायक

पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला बळकटी देण्याचे काम सुरू केले आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा पक्ष १० ते १२ जागांवर निवडणूक लढवू शकते. नुकतीच पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी अकोला येथे या संदर्भात बैठकही घेतली आहे. प्रहारही मनपा निवडणुकीतील एन्ट्री प्रमुख राजकीय पक्षांसाठी धक्कादायक ठरू शकते.

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही पक्षासोबत आघाडी करायची नाही, ही काँग्रेसची भूमिका आजही कायम आहे. काही समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे पर्याय खुले ठेवण्यात आले असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही प्रमुख पक्षाला सोबत घेवून निवडणूक लढणार नसल्याचेच सध्या चित्र आहे.

... तर राष्ट्रवादीला शोधावा लागेल पर्याय!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढल्यास शहरातील मोठ्याप्रमाणावर मतविभाजन टळू शकते. मात्र, गेले काही वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तुझे माझे जमने, तुझ्या वाचून करमे ना’ असे सुरू आहे. काँग्रेस स्वतंत्र लढण्यावर शेवटपर्यंत कायम राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला महानगरपालिका निवडणुकीत पर्याय शोधावा लागू शकतो. हा पर्याय शिवसेनाही असू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाविकासची बिघाडी भाजपच्या पथ्यावर

महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा भाजपला सर्वाधिक होणार आहे. तीन सदस्यी प्रभाग रचनेमुळे आधीच इतर पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण असताना हे पक्ष स्वतंत्र लढण्याच्या निर्णायावर ठाम राहिल्यास ते भाजपच्या पथ्यावरच पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com