
अकोला : शेतकऱ्यांची दिशाभूल अन् लिंकिंग भोवली
अकोला : शेतकऱ्यांसोबत अरेरावी, शेतकऱ्यांची दिशाभूल, लिंकींग करून खत विक्री, नोंदवहीतील अनियमितता इत्यादी बाबींमध्ये दोषी आढळून आल्याने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के.बी. खोत यांनी जिल्ह्यातील मे. पाटणी ट्रेडर्स अकोला यांचा रासायनिक खते खरेदी-विक्री करण्याचा १७ एप्रिल २०२७ प्रर्यंत वैध असलेला परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.
बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील शेतकरी उज्ज्वल बोचरे यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, ते १८ जून २०२२ रोजी मे. पाटणी ट्रेडर्स अकोला यांच्या रासायनिक खते विक्री केंद्रात खत खरेदी करायला गेले असता, तेथील बिल तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना खताच्या बॅगेसोबत औषधीची (बीज प्रक्रियेची) बॉटल सक्तीने घ्यायला लावली. त्यांनी विरोध केला असता बॉटल घेतली नाही तर, खत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.
या सक्तीबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे शेतकऱ्याने म्हटल्यानंतर ‘हो जा करा’ असे दटावल्याचे कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीत व सुनावनीत नमूद केले आहे. शिवाय विक्री केंद्रात ४०० पोते शिल्लक आहे असे सांगून तुटवडा भासवण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही बोचरे यांनी सांगितले. त्यानुसार चौकशी केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मे. पाटणी ट्रेडर्स अकोला यांचा रासायनिक खते खरेदी-विक्री परवाणा रद्द केल्याची कारवाई केली आहे.
यामुळे झाला परवाना रद्द
डिएपी खतासोबत जैविक बॉटलची जबरदस्तीने लिंकींग करून विक्री. डिएपी पोते जास्त प्रमाणात असताना देखील कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करून लिंकींग. शेतकऱ्यांना अपमानित करून लाईनमधून खत न देता बाहेर काढने. विक्री केलेल्या सर्व खतांच्या उगम प्रमाणपत्र परवान्यात समावेश करून घेतले नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या काही बिलांवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेतली नाही. विक्री केलेल्या जैविक बॉटलची नोंद साठा नोंदवहीत घेतली नाही. घाऊक साठा नोंदवहीमध्ये पान क्र.४४ वर ग्रोमर या कंपनीचे ४२८ बॅग डिएपीची नोंद घेतली असून, प्रत्यक्षात गोदामामध्ये खत नाही. साठा नोंदवही अद्यावत नाही. पॉस मशीनद्वारे विक्री केली नाही.
Web Title: Patni Traders Chemical Fertilizers License Ban Agriculture Department Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..