esakal | अकोल्याचे गजानन घोंगडेंमुळे पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला मिळणार नवी ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

Gajanan Dhongade

गजानन घोंगडेंनी अकोल्याच्या शिरपेचात खोवला आणखी एक तुरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पासाठी लोगो डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये अकोला शहरातील ग्राफिक डिझायनर तथा ब्रॅण्ड एक्सपर्ट गजानन घोंगडे यांच्या लोगो डिझाईनला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापुढे गजानन घोंगडे यांनी डिझाईन केलेला लोगो पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाची नवी ओळख ठरणार आहे.

डिझाईन संदर्भात गजानन घोंगडे यांनी बोलताना सांगितले, लोगो डिझाईन तयार करताना तो कल्पक असावा आणि सहज समजणारा असावा. त्याचप्रमाणे सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या गोष्टीसाठी म्हणून आपण लोगो डिझाईन करतो, मग तो व्यवसाय असो, संस्था असो, उपक्रम असो त्या संस्थेचे, व्यवसायाचे उद्दिष्ट, स्वरूप त्यामधून त्वरेने प्रतीत व्हावे, ही असते. डिझाईन तयार करताना या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे.

हेही वाचा: केळी खाणे आरोग्यदायी; आरोग्यशास्त्रात फार महत्त्व

व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे प्रामुख्याने वाघाशी संबंधित गोष्टींचा विचार केला. ज्यामध्ये एक म्हणजे वाघाचा रंग, त्याच्या शरीरावरील पट्टे ही वाघाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये वन, वन्यजीव आणि पर्यावरण यांची जपणूक होत असते, निसर्गानी ज्या स्वरूपात आपल्याला हे दान दिलेले आहे, ते त्या स्वरूपात असावे यासाठी हा सारा खटाटोप असतो.

तो विचार पेंच ही अक्षरे लिहिताना केलेला आहे. कुठलाही फॉन्ट न वापरता सहज सोपी, वाचता येणारी, परंतु काहीशी ओबडधोबड वळणाची अक्षरे यामध्ये लिहिलेली आहेत आणि वर ज्याप्रमाणे उल्लेख केला की लोगो डिझाईनमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तो कल्पक असावा, त्यासाठी म्हणून पेंच मधल्या ‘पी’ या अक्षरामध्ये वाघाच्या डोळ्याचा खुबीने वापर करून ते अक्षर रेखाटले आहे.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

एकूणच पूर्ण लोगो पाहताना वाघाशी संबंधित काहीतरी आपण पाहतो आहे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला व्हावी, हा उद्देश हे डिझाईन तयार करताना डोळ्यापुढे ठेवलेला आहे. यातली ‘टायगर रिझर्व ही’ अक्षरे साध्या, सरळ कॉम्प्युटरच्या फॉन्टमध्ये घेतलेली आहेत. पेंच हे अक्षर थोडे क्रिएटिव पद्धतीने लिहिल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून ‘टायगर रिझर्व’ ही अक्षरे सरळ साध्या सोप्या पद्धतीची घेतलेली आहेत.

राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला लोगोद्वारे ओळख मिळणे हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तीस वर्षांच्या कला प्रवासात भक्कम पणे पाठीशी उभी असलेली आणि सतत माझा उत्साह वाढवणारी पत्नी गंधाली हिला या यशाचे श्रेय देतो.
- गजानन घोंगडे

राष्ट्रीय स्तरावर गाजल्यात कलाकृती

गजानन घोंगडे यांना यापूर्वी व्यंगचित्रसाठी राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळालेले आहेत. शासनाने घेतलेल्या जाहिरात आरेखन स्पर्धेतही त्यांना भारतातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांच्या व्यंगचित्र क्षेत्रातील योगदानासाठी पुण्याच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार आणि कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या व्यंगचित्र मालिकेचे त्यांनीही कौतुक केले आहे.

loading image
go to top