कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा! शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात | Farmer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Supply-Cutting
कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा! शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा! शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

बुलडाणा/घाटबोरी : जिल्ह्यात महावितरणकडून थकीत वीजबिलापोटी आता कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. शेतकर्‍यांना पीकविमा, सानुग्रह अनुदान प्राप्त होताच आताही कारवाई होत असल्यामुळे एकीकडे मदत तर दुसरीकडे पठाणी वसुली होत असल्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील १५० पेक्षाही अधिक शेतकर्‍यांच्या वीज जोडणी कापली असल्याचे कळते.

मेहकर तालुक्यातील घाटबोरीसह लोणीगवळी परिमंडलातील शेतकर्‍यांच्या शेतातील कृषीपंपाची वीज कापणीचा बेधडकपणे सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. शेतकर्‍यांना या बाबतची कुठलीही कल्पना न देता किंवा नोटीस न देता कृषी पंपाची वीज तोडली आहे. वीज बिल भरण्यासाठी शेतकर्‍यांना मुदत न देता कृषी पंपाचे फिडरचे विद्युत पुरवठा कट केल्यामुळे शेतकरी संतापले आहे. अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊनमुळे सर्वसमान्याप्रमाणेच शेतकरी देखील अडचणीत आहे.

रब्बी हंगामातील पिक, गहू, हरभरा, कांदा, फळांना पाणी देण्याची वेळ असताना त्याची महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घाटबोरी, लोणीगवळी, भोसा, दुर्गबोरी,गावातील जवळपास शंभर शेतकर्‍यांच्या शेतातील कृषीपंपाची वीज कापली. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन जोडून द्या अन्यथा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. महावितरण कंपनीच्या त्रासामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

हेही वाचा: Akola : आता ग्रा. पं.मध्येही ओबीसीला फटका; खुल्या प्रवर्गातून भरणार पदे

शेतकर्‍यांच्या, गुरा-ढोरांचा त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न आहे शिवाय शेतातील पीक, फळबागांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरणकडून मात्र थकीत वीज बिलासाठी त्यांचे कनेक्शन कट करण्यात आले. शेतकर्‍यांवर अस्मानी व सुलतानी प्रकारची संकट ओढवत असल्याने त्यांना वीज बिल भरणे शक्य झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या शेतकर्‍यांच्या शेतात अन्य रबीपिके असून या पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक असताना महावितरण कडून कोणतीही कल्पना न देता अचानकपणे वीज पुरवठा खंडित केला केल्यामुळे शेतकर्‍यांवर महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी फार मोठा अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहे.

सरकारच्या खोट्या वल्गना!

शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचे थकीत वीजबिल माफ करू शेतीपंपाला मोफत वीज देण्याचे शासनाने आश्‍वासनतर्फे आले होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचा आकडा फुगत गेला. कोरोनाच्या संकटात शेतीपंपांना वीजबिलात सवलत देण्याच्या खोट्या वल्गना करत एक वर्षाने शेतकर्‍यांच्या शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी करणार्‍या सरकारने बळीराजाला लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन बळीराजाचा अवमान केला असून, किसान सन्मानाच्या योजना राबविणार्‍या शासनाने थकीत वीजबिलाची टांगती तलवार शेतकर्‍यांच्या डोक्यावर ठेवून बळीराजाचा एकप्रकारे विश्वासघात केला आहे, असा आरोप संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.

वरिष्ठ कार्यालयांचे मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार थकीत वीजबिल कृषीपंपधारक शेतकरी यांना सूचना करून सुद्धा चालूविज बिल भरण्यासाठी सहकार्य करत नाही. यामुळे ट्रान्सफॉर्ममधूनच वीज खंडित करण्यात आली आहे. आता तरी महावितरण कंपनीला चालू वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे.

- ए. टी. गोळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, डोणगाव

loading image
go to top