
अकोला : चार लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन
अकोला - जेमतेम दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व इतर कृषी उपयोगी साहित्य वेळेवर मिळावे यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आगामी खरीप हंगामात जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ५६० हेक्टर कृषी क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक २ लाख २० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा हवामान विभागाने पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये पावसाळ्यात ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहेत. जूनच्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. गत वर्षी सुद्धा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगेल उत्पादन झाले, परंतु परतीच्या पावसासह अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला. या स्थितीनंतर सुद्धा कपाशी व सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळाला. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे अधिक राहण्याची शक्यता आहे, तसे नियोजन सुद्धा कृषी विभागाने केले आहे.
सोयाबीननंतर कपाशीचा पेरा सुद्धा जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने बी-बियाण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात २ लाख २० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असून त्यासाठी बाजारात २१ हजार ९०६ क्विंटल महाबीज, एनएससी व कृभकोचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तर ३५ हजार ५४४ क्विंटल खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कपाशीची लागवड सुद्धा गत वर्षीच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता असून कपाशीचा पेरा १ लाख ६० हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी खासगी कंपनीचे चार हजार पॅकेट्स/क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
असे आहे पिकांचे नियोजन
पीक क्षेत्र हेक्टरमध्ये
सोयबीन २ लाख २० हजार
कापूस बीटी १ लाख ६० हजार
तूर ५५ हजार
मुग २३ हजार
उडीद १६ हजार
ज्वारी ६ हजार
मका २५०
बाजरा २००
भुईमूग १०
तीळ १००
एका लाख ७४ हजार १४५ क्विंटल बियाणे
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार सोयाबीनचे १ लाख ६५ हजार, तूर २ हजार ८८८, मुग ९९४, उडीद ७६८, ज्वारी ४५०, मका ३८, बाजरा ५ तर तीळाचे १ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
साडेतीन लाख क्विंटल बियाणे घरचे
यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारातील कंपन्यांच्या बियाण्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यानुसार खरीप हंगामात शेतकरी ३ लाख ५६ हजार ३७२ क्विंटल घरचे बियाणे वापरतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे पेरण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घरच्याच चांगल्या सोयाबीन बियाण्यांचा वापर करावा. बियाणे व इतर संदर्भात काही तक्रारी असल्यास कृषी विभागासोबत संपर्क साधावा.
- मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.
Web Title: Planing Of Sowing On 48 Lakh Hectares
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..