हुल्लडबाजांवर पोलिसांचे लक्ष | akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुल्लडबाजांवर पोलिसांचे लक्ष

अकाेला : हुल्लडबाजांवर पोलिसांचे लक्ष

अकाेला : त्रिपुरामधील कथित घटनेचे पडसात अमरातवीसह अन्य जिल्ह्यात उमटले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे घडलेल्या किरकोळ घटनेनंतर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत संचारबंदी लागू केली आहे. त्या पृष्ठभूमीवर अकाेल्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रविवारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत अनुचित प्रकार राेखण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला असून, हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांवर पोलिस लक्ष ठेवून आहे. त्यांचे ‘मास्टमाईंड’ शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला.

हेही वाचा: अकोट शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

अकोला जिल्ह्यात शुक्रवारी मुस्लिम बहुल भागातील मुस्लिम व्यावसाियकांनी दुकाने बंद ठेवून त्रिपुरातील घटनेचा निषेध नोंदविला होता. शनिवारी अमरावती येथे त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर भाजपच्या वतीने टिळक रोडवर राम मंदिरापुढे निदर्शने करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. त्या पृष्ठभूमीवर क्रिया-प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटून शांतता भंग होऊ नये व जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था अबाधित रहावी यासाठी रविवारी शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीला आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी नीमा अराेरा, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्यासह महसूल व पाेलिस अधिकारी तथा जिल्हा शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

सभेत आमदार गाेपीकिशन बाजाेरीया, ॲड. महेंद्र साहू, शाैकत अली, रहेमान बाबू, डाॅ. माेहन खडसे, कपिल रावदेव, डाॅ. संताेष हुसे, पापाचंद्र पवार, मनाेहर पंजवाणी, नईम फरास, जावेद जकेरिया, भरत मिश्रा आदींनी मनाेगत व्यक्त केले.

हेही वाचा: नागपूर : एसटी संप; आठ दिवसांत साडेचार कोटी बुडाले

पुढचे काही दिवस चिंताजनक

विविध धार्मिक उत्सवांमध्ये अनुचित प्रकार घडले नाहीत. मात्र आता एखाद्या ठिकाणी घडलेल्या घटनेवरून पुढील चार-पाच दवस चिंताजनक असून, सावध राहवे लागणार आहे. अनुचित प्रकार राेख‌ण्यासाठी पाेलिसांकडे पुरेसे मनुष्य बळ आहे. आवश्यकता भासल्यास इंटरनेट सेवा खंडीत करणे, संचारबंदीसारखे निर्णय घेता येतात. त्यामुळे प्रशासनावर कठाेर कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी बैठकीत दिला.

जिल्हाधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन

सामाजिक माध्यमाव्दारे प्रसारीत होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखावी व त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखून शांततेचा भंग होवू नये याकरीता शांतता समितीतील सदस्यांनी जिल्ह्यात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे. व्हॉट्सॲप सारख्या समाज माध्यमांव्दारे प्रसारीत होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका. अशा संदेशाना प्रसारीत करु नका. अशा संदेशाचे प्रसारण करणाऱ्यावर सक्तीने कायदेशीर कार्यवाही करा. जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्याकरीता पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी दिले.

loading image
go to top