एसटी संप; आठ दिवसांत साडेचार कोटी बुडाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : एसटी संप; आठ दिवसांत साडेचार कोटी बुडाले

नागपूर : एसटी संप; आठ दिवसांत साडेचार कोटी बुडाले

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नागपूर विभागाला तब्बल साडेचार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच संपामुळे गिरणी कामगारांच्या वाट्याला जसे दुःख आले होते तसे एसटी कामगारांना येऊ नये, अशा प्रतिक्रिया कामगार नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. एकीकडे प्रवाशांना खासगीतून प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे नागपूर विभागाचे दर दिवसाला ४८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यास वेतन शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.

हेही वाचा: अकोट शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

नव्याने रुजू झालेल्या एसटी कामगाराला १० ते १२ हजार रुपये वेतन मिळते. यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. परंतु, एसटीचे शासनात विलीनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील आठ दिवसांपासून बसेस जागीच उभ्या आहेत. संप कायम असल्याने दर दिवसाला तोटा वाढत आहे. महामंडळाने नागपूर विभागातील ९४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

शहरातील घाटरोड, गणेशपेठ, इमामवाडा येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संप कायम राखला आहे. आरपारची लढाई करून मागण्या मान्य करून घेणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे, आंदोलनस्थळी एका कामगार नेता म्हणाला, पुढाऱ्यांनी चिथावल्यामुळे चार दशकांपुर्वी गिरणी कामगारांची जी दयनीय अवस्था झाली होती, तीच अवस्था आता एसटीचा संप चिघळल्याने एसटी कामगारांची होण्याची भिती आहे.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

बसपाचा आंदोलनाला पाठिंबा

बहुजन समाज पार्टीनेही पाठिंबा दिला आहे. जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदिप मेश्राम, प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, मध्य नागपूर अध्यक्ष प्रविण पाटील, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष सदानंद जामगडे, माजी जिल्हा प्रभारी आनंद सोमकुवर, प्रकाश फुले, अशोक मंडपे यांनी मंडपाला भेट देऊन आपले समर्थन पत्र दिले. यावेळी विजय बोंद्रे, राकेश काळबांडे, शेखर तामगाडगे, अंकित कोल्हे, उमा घाडगे, विद्या गजभिये, विक्रांत बैस, अमोल मेश्राम, किशोर इंगळे, सोनिया हरडे, अलका गजभिये, प्रमोद वाघमारे, प्रविण गेडाम, इरशाद अली आदी उपस्थित होते.

दर दिवसाला असे उत्पन्न बुडते

  • घाटरोड ७ लाख ७० हजार ३८५

  • गणेशपेठ ११ लाख ४९ हजार ४७०

  • उमरेड ४ लाख ८४ हजार ०५०

  • काटोल ५ लाख १८ हजार १७५

  • रामटेक ४ लाख २७ हजार ९१०

  • सावनेर ४ लाख १६ हजार १५०

  • इमामवाडा ६ लाख १९ हजार ०८०

  • वर्धमाननगर ४ लाख ३४ हजार ५९५

loading image
go to top