अकोला - अकोला जिल्ह्यातील राजकारणाचा सूरच आता बदलू पाहतोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने एकामागोमाग एक नाट्यमय निर्णय घेत भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत निर्णायक झटका दिला आहे..शिवसेना संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या संघटनात्मक धोरणावर विश्वास ठेवत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा थेट शिवसेनेत प्रवेश आणि तात्काळ जिल्हाप्रमुखपदाची घोषणा ही भाजपसाठी केवळ धक्का नाही, तर हा एक सर्जिकल स्ट्राइकच आहे.इकडे ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये घुसमट झालेल्या माजी जि.प. अध्यक्षा संध्याताई हरिभाऊ वाघोडे, जि. प. सदस्य प्रतिभाताई अवचार आदी नेत्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एन्ट्री केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व परिस्थितीत कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत..या राजकीय भूकंपामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना ढवळून निघाल्या असून, काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र मतदारराजा मात्र आता अधिक जागृत झाला असून पक्षनिष्ठेपेक्षा सक्षम नेतृत्व आणि भूमिकेवर मतदान होईल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.भाजपसाठी हा फक्त एक धक्का नसून, त्यांच्या गडावर हल्ला झाल्याचं स्पष्ट संकेत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये अकोल्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार हे निश्चित आहे! नारायणराव गव्हाणकर हे बाळापूर व अकोट भागात भाजपचे मजबूत चेहेरे मानले जात होते. त्यांचा पक्षत्याग आणि शिंदे गटातील झेप ही भाजपच्या गोटात मोठी उधळण करणारी घटना ठरली आहे..गव्हाणकर यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील हितसंबंध जोडलेले लोकही आता शिवसेनेकडे वळतील, हे उघड आहे. त्यामुळे अकोट-बाळापूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली असून पुन्हा गणितं मांडावी लागणार आहेत.यासोबतच, अकोला जिल्हा परिषदचे माजी सभापती आणि अनुभवसंपन्न नेते चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांची मूर्तिजापूर तालुक्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती ही दुसरी मोठी खेळी ठरली आहे. हे दोन्ही निर्णय भाजपच्या परंपरागत मतदारसंघांमध्ये शिवसेनेने थेट शिरकाव केल्याचे स्पष्ट संकेत आहेत..या सर्व पार्श्वभूमीवर एक नाव ठळकपणे पुढे येते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया. शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्यांवर तुटून पडत, संपर्क नेत्याच्या भूमिकेतून त्यांनी जे संघटन मजबूत केले, त्याचा परिपाक या नियुक्त्यांतून स्पष्ट होतो.काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात सूर लावण्याचा प्रयत्न केला खरा, पण बाजोरिया यांनी त्यांना संघटनेच्या रेषेवर आणत आपले वर्चस्व ठणकावून सिद्ध केले आहे. ते आता शिवसेनेतील फक्त संपर्क नेते नाहीत, तर अकोला जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर ‘किंगमेकर’ बनले आहेत. एवढे मात्र खरे..या बदलामुळे आता अकोला जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुख काम करत असून, मागील नेतृत्वाच्या हातातील तालुक्यांचा प्रभाव आता नव्या रक्ताकडे गेला आहे. हे शिवसेनेतील सत्तांतर नव्हे, तर सक्षमीकरणाचे धोरण आहे, आणि त्याचवेळी भाजपसाठी धोका ठरू शकणारे समीकरणही.भाजपाला खेळावा लागेल बचावात्मक डावभाजपने अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात वर्चस्व राखले, पण आता ती मक्तेदारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कारण, ज्या नेत्यांच्या आधारे भाजपने सत्ता राखली, तेच आता शिवसेनेच्या गोटात जात आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजपच्या गोटात ताबडतोब बचावात्मक डाव खेळण्याची वेळ आली आहे..‘राष्ट्रवादी काँग्रेस’लाही पसंतीअकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा राजकीय बूस्टर मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिंदेसेना व अन्य संघटनांतील अनेक जि.प. सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पदाधिकाऱ्यांनी मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.पातूरचे नगराध्यक्ष बुऱ्हान ठेकेदार, माजी जि.प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जि.प. सदस्य काशीराम साबळे, प्रतिभाताई अवचार आदींचा यात समावेश आहे. या प्रवेशामुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची स्पष्ट चिन्हं असून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात अधिक भक्कम आणि निर्णायक बनली आहे..आमदार अमोल मिटकरी व जिल्हाध्यक्ष मो. बद्रुजम्मा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादीची वाट स्विकारल्याची प्रतिक्रिया नव्याने दाखल झालेल्या नेत्यांनी दिली. यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात अधिक भक्कम आणि प्रभावी बनल्याचे दिसते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.