अकोला : अंत्योदय गटातील मोफत गहू वाटपाला कात्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana

अकोला : अंत्योदय गटातील मोफत गहू वाटपाला कात्री

अकोला : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेल्या गहू वितरणाला शासनाने कात्री लावली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता दोन किलो मोफत गव्हा ऐवजी एकच किलो मोफत गहू मिळेल. कमी झालेल्या गव्हाच्या वाटपाबदल्यात लाभार्थ्याला एक किलो मोफत तांदुळ मिळेल. त्यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय गटातील एक लाख ९२ हजार ९३६ लाभार्थ्यांना बदललेल्या शासन धोरणाचा फटका बसेल.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मार्च-एप्रिल २०२० पासून मोफतचे धान्य देण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांना मे व जून २०२१ मध्ये मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरीबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविली होती. दरम्यान सदर मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपत असतानाच केंद्र सरकारने मार्च २०२२ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. सदर मुदत संपत असतानाच केंद्र सरकारने योजनेला आणखी सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे त्याचा दिलासा महागाईमुळे चिंतित असलेल्या नागरिकांना मिळत आहे.

असा झाला बदल

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतून आता लाभार्थ्यांना प्रतिसदस्य प्रतिमाह १ किलो गहू व ४ किलो तांदुळाचे वाटप करण्यात येईल. सदर वाटप लाभार्थ्यांना मोफत करण्यात येणार आहे. यापूर्वी या गटातील लाभार्थ्यांना दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत होते.

प्राधान्य गटातील वाटप ‘जैसे थे’

अंत्योदय गटातील लाभार्थ्यांच्या गहू वाटपाला कात्री लागली असली तरी प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मात्र प्रतिसदस्य प्रतिमाह दोन किला गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप मोफतच करण्यात येईल. केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना यानंतर एक किलो गहू व चार किलो तांदुळाचे वाटप करण्यात येईल, तर प्राधान्य गटातील धान्य वाटपात कोणताच बदल झाला नाही.

- बी.यू. काळे जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Web Title: Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Beneficiaries Will Get 1kg Free Wheat Instead 2kg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top