अकोला-खंडवा रेल्वेमार्गाचा तिढा कायम!

पश्चिम झोन परिषदेत राखीव वनक्षेत्राचा प्रश्न अनुत्तरीतच; महाराष्ट्र सरकारसोबत स्वतंत्र बैठक घेणार
Akola-Khandwa Railway Gauge
Akola-Khandwa Railway Gauge Sakal

अकोला - दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून पूर्णा-रतलाम रेल्वे मार्गातील अकोट ते खंडवापर्यंतच्या गेज परिवर्तनाच्या अडचणी अद्यापही कायम आहेत. राखीव वनक्षेत्रातून रेल्वे मार्ग जात असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ता. ११ जून रोजीच्या पश्चिम झोन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

या रेल्वे मार्गातील पूर्णा ते अकोलापर्यंतचे काम सन २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. अकोला-अकोटपर्यंतचे कामही ता.२३ व २४ जुलै २०२० रोजी स्पीड रेल्वे चालवून परीक्षण घेत पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात हा खंडवापर्यंत २५७ किलोमीटर गेज परिवर्तनाचा टप्पा होता. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या मार्गाला पर्यावरणवाद्यांचा विरोध झाल्याने अकोट ते आमलाखुर्दपर्यंतचे गेज परिवर्तनाचे काम १४ वर्षांनंतरही सुरू होऊ शकले नाही. एकूण ७७ किलोमीटर मार्गाचे काम रखडले आहे. या रखडलेल्या रेल्वे मार्गाबाबत दिवू येथे ता. ११ जून रोजी झालेल्या पश्चिम झोन परिषदेच्या २५ व्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दोन वर्षांनंतरही दक्षिण झोन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत अकोट-खंडवा मार्गासोबतच विदर्भातील बारटोला-गोंदियादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे दोन्ही मार्ग राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने त्याला राज्याकडून अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यासाठी दोन्ही रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.

तुर्तास जुन्या मार्गावर ठाम

अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग जुन्याच मार्गावरून गेज परिवर्तनासह करण्याबाबत रेल्वे बोर्ड ठाम असल्याची माहिती आहे. पर्यायी मार्ग करताना भूसंपादनाचा प्रश्न येणार आहे. त्यामुळे मार्ग तयार करण्याचा खर्च वाढणार आहे. त्यापेक्षा थेट अकोला-भुसावळ-खंडवा हा सध्या तयार असलेल्या रेल्वे मार्गाच सोयीचा ठरू शकतो. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून पर्यायी मार्गा ऐवजी जुन्या नॅरोगेज मार्गावरच गेज परिवर्तनाचा आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे. त्यासाठी वन विभागातून इलेव्हेटेट रूट बनविण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वर अशाप्रकारचे पूल तयार करण्यात आले असून, हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

पर्यायी रेल्वे मार्गाबाबत चर्चा नाही

अकोला ते खंडवा हा जुना नॅरोगेज रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रातून जात असल्याचे वन्यजीवांना धोका आहे. त्यामुळे गेज परिवर्तन करताना हा मार्ग पर्यायी मार्गाने वळविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार हिवरखेडपासून हा मार्ग सोनाळा, टुनकी जामोद मार्गे वळविण्याचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावाबाबत ता. ११ जून रोजी दिवू येथे झालेल्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बैठकीच्या ‘मिनिट्स’वरून स्पष्ट होते.

राज्य वन्यजीव मंडळाचा विरोध

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेज परिवर्तनासह रेल्वे मार्गाला महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत निर्णय घेवून त्याबाबत केंद्र सरकारला अवगत करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा केंद्र सरकारकडून या मार्गाबाबत प्रस्ताव आल्यास राज्य वन्यजीव मंडळ कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com