अकोला शहरात २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला शहरात २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी

अकोला शहरात २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी

अकोला : फुलपाखरू म्हटले तर आपल्या नजरेसमोर येते विविध आकार, विविध रंगाची, सर्वांना आकर्षित करणारी निसर्गाची सर्वात सुंदर रचना. त्यामुळे लहानांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांनाच फुलपाखरे आवडतात. फार पूर्वीपासूनच फुलपाखरं आपल्या आजूबाजूला वावरत आलेली आहेत. आपल्याला उपलब्ध होत असलेल्या अन्नसाठ्यापैकी ३० टक्के अन्नसाठा फुलपाखरांच्या परागीभवनाचे प्रक्रियेतून मिळत असतो. अन्नसाखळीतही फुलपाखरं फार महत्त्वाची भूमिका बजावित असतात. त्याच बरोबर फुलपाखरांच्या निरीक्षणाकरिता दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक आपल्या देशाला भेटी देत असतात. त्यातून देशाच्या संपत्तीत कोट्यावधी रुपयांचा महसूल जमा होत असतो.

हेही वाचा: नागपूर : औद्योगिक भूखंडांवर प्रचलित दरानेच हवी स्टॅम्प ड्यूटी

फुलपाखरू निरीक्षण ताण घालविण्याचे एक उत्तम साधन आहे. परंतु वाढते प्रदूषण, तणनाशक- कीटकनाशकांचा वाढता वापर, विदेशी फुलझाडांचे वाढते प्रस्थ, हवामान बदलाच्या गडद संकटामुळे फुलपाखरांच्या किती प्रजाती शहरातून हद्दपार होत होण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी माहिती ब्लू मॉरमॉन नेचर क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री हरीश शर्मा यांनी दिली आहे. शहरातील पार्क, खुली मैदाने, उद्याने, रस्त्याकडील विविध भागात केलेल्या अभ्यास दौऱ्यात या वर्षी शहरात २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी झाल्याची माहिती त्यांनी दिली. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्याच्या कालावधीत क्लबच्या सदस्यांनी फुलपाखरांच्या विविध प्रजातींचा शोध घेतला. या अभ्यास दौऱ्यात नेचर क्लबचे हरीश शर्मा, तेजस्वीनी रापर्तीवार, श्रीकांत पंडित, संध्या प्रजापती, सौरभ पांडे, श्रद्धा शुक्ला, सुकन्या यादव, राम शर्मा यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या प्रजातींची झाली नोंद

जोकर ,कॉमन ग्रास येलो, कॉमन जेझबेल, कॉमन जे,टैलड जे,लाइम बटरफ्लाय,कॉमन गल, व्हाईट पायोनियर, कॉमन एविनिंगब्राउन, ग्रे पैन्सी,प्लैन टाइगर,पी ब्लू, कॉमन इंडियन क्रो, ग्रेट इगफ्लाय, कॉमन कास्टर , कॉमन बैंडेड आउल, कॉमन रोझ , कॉमन मॉरमॉन,कॉमन इमिग्रंट, ऑरेंज टीप ,रेड टीप ,येलो टिप ,लेमन पैन्सी, कॉमन बुशब्राउन ,कॉमन लेपर्ड, टॉवनी कॉस्टर, स्ट्रिपड टाइगर,ग्राम ब्लू,स्टेट प्लॅश अशा २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या.

गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के घट

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या रोडावल्याची माहिती आहे. गेल्या तीस वर्षात फुलपाखरांच्या संख्येत ४४० टक्के घट झाल्याचा पर्यावरण अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. फुलपाखरं समृद्ध पर्यावरणाची निशाणी असतात त्यांची घटती संख्या चिंताजनक आहे. शहराच्या विविध भागात या वर्षी मृतावस्थेत आढललेल्या फुलपाखरांची संख्या अधिक असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात फुलपाखरू संवर्धनाकरिता अधिक जोमाने कार्य करू असे मत क्लबच्या युवा निसर्ग अभ्यासक तेजस्विनी रापर्तीवारने व्यक्त केले.

loading image
go to top