esakal | अकोट हादरले! लसीकरण पथकाचा बनाव करून भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अकोट हादरले! लसीकरण पथकाचा बनाव करून भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील मध्यवर्ती भागात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवारी वेस याठिकाणी मंगळवारी दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी दरोडा (akola robbery) टाकला. लसीकरण पथक असल्याचा बनाव करीत दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण केली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

मंगळवारी अकोट शहरातील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मी हार्डवेअरचे मालक अश्विन सेजपाल पत्नीसह लग्नसमारंभासाठी खामगाव येथे गेले असता चोरट्यांनी भरदिवसा घरावर दरोडा टाकून घरातील सदस्यांना मारहाण केली. ही घटना दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान घडली. अश्विन सेजपाल यांच्या घरी आई-वडील, व मुलगी होते. दुपारच्या सुमारास सहा व्यक्ती लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव करून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. घरातील सदस्यांची प्राथमिक माहिती विचारतांना पथकातील सदस्य हिंदीमधून प्रश्न विचारत होते. यावेळी अश्विन सेजपाल यांची मुलगी देलीशा हिला संशय आला. तिने या लोकांना दरवाजा बाहेरच थांबवून बनावट पथकाकडे ओळखपत्राची मागणी केली. त्याचवेळी या पथकातील एका महिलेने जोराने दरवाजा ढकलून आतामध्ये प्रवेश केला. दरवाजा ढकलताच देलीशा कोसळली. यावेळी तीन पुरुष, तीन महिला यांनी घरात घुसून देलीशाला आरडाओरडा केल्यास चाकू मारण्याची धमकी दिली. देलीशाच्या तोंडात बोळे कोंबून चिकटपट्टी मारत हात पाय बांधण्यात आले. यावेळी स्वयंपाक खोलीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या अमृतलाल सेजपाल हॉलमध्ये परत येत असताना दरोडेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर मारायला सुरुवात केली. जखमी झालेले अमृतलाल सेजपाल जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली.

अश्विन सेजपाल यांच्या आई इंदूबाई सेजपाल या दुसऱ्या खोलीत असताना दरोडेखोरांनी त्यांनासुद्धा खुर्चीला बांधून ठेवले. यानंतर घरातील सर्व कपाटातील सामान बाहेर काढून अस्ताव्यस्त फेकण्यात आले. यावेळी इंदूबाई सेजपाल यांच्या हाताची दोर सुटल्याने त्यांनी देलीशाकडे धाव घेत तिची हाताला बांधलेली दोर सोडली. देलीशा हिने समयसूचकता दाखवीत चेहऱ्यावरील पट्टी हटवून खिडकी जवळ येत मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केली. यावेळी तेथेच उपस्थित असलेल्या बंटी सेदाणी याने पहिल्या मजल्यावर कुणीतरी मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे लक्षात आले. त्याने लगेच चंचल पितांबरवाले यांना घेऊन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाला. मुलगी मदतीसाठी जोरात आरडाओरडा करत आहेत म्हणून घाबरलेल्या दरोडेखोरांनी तेथून पळून जाऊन दरवाजा बाहेरून बंद केला. बंटी सेदाणी आणि चंचल पितांबरवाले मदतीसाठी पहिल्या माळ्यावर पोहचेपर्यंत दरोडेखोर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

गजबजलेला चौक म्हणून सोनू चौकांची ओळख आहे. सोनू चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवारी वेस भागात भर दुपारी व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यासह ठसे तज्ज्ञ ,श्वानपथक घटनास्थळावर दाखल झाले होते.

निष्क्रीय डीबी पथकाचे करायचे काय?

अकोट शहर पो.स्टे.ला.पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची नियुक्ती होऊन जेमतेम १० दिवसाचा कालावधी झाला आहे. त्यांना सद्यस्थितीत शहराची भौगोलिक माहिती झालेली नसून शहर पो.स्टे.लाआधीपासून असलेले अंमलदार व अधिकारी यांनी शहरा बाबतची माहिती ठाणेदाराना पुरविणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे कार्यान्वित असलेले डीबी पथक केवळ बुजगावने असल्याचे बोलले जात आहे. एकाच आठवड्यात दोन घरफोड्या झाल्या असल्यामुळे व विशेष म्हणजे आजची भरदिवसा घडलेली घटना शहराला हादरा देणारी आहे. त्यामुळे डीबी पथक निष्क्रिय झाले असून, या निष्क्रिय डीबी पथकाचे करायचे काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

loading image
go to top