esakal | रेमडिसीवर इंजेक्शनसाठी कक्ष सेवकाने घेतले दहा हजार? रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

injection

याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे.

रेमडिसीवर इंजेक्शनसाठी कक्ष सेवकाने घेतले दहा हजार? रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप

sakal_logo
By
अरुण जैन

बुलडाणा: एकीकडे शासन प्रशासन सर्व यंत्रणा कोरोना महामारीच्या संकटाविरुद्ध लढत असताना दुसरीकडे मात्र रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रकार बुलडाणा सामान्य रुग्णालयात घडला. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील ५४ वर्षीय महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने तिला बुलडाणा सामान्य रुग्णालयातील डेडीकेट कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने अतिदक्षता कक्षात त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. यामध्ये अतिदक्षता विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कक्ष सेवक सागर जाधव याने सदर महिला रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगून या इंजेक्शननी रुग्ण बरा होतो व या इंजेक्शनसाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा इंजेक्शनसाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.

दरम्यान सहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री सदर महिलेचा मृत्यू झाला. सकाळी नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन या घटनेची तोंडी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना दिली. श्री. वासेकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांच्या कानावर ही बाब घातली.  त्यावेळी त्यांनी स्वतः रुग्णालयात पोहोचून या संदर्भातील विचारपूस केली.

मात्र सागरने त्यांना योग्य माहिती न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे. यामध्ये डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी सचिन कदम, सचिन वासेकर फिजिशियन अस्लम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा या समितीमध्ये समावेश असेल.

दोषींवर कारवाई करू : डॉ घोलप 

हॉस्पिटलच्या अतिदक्षता कक्षात एका रुग्णाच्या नातेवाइकाकडून कंत्राटी सेवकाने दहा हजार रुपये घेतल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे. डाॅ. सचिन वासेकर यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रारंभिक चौकशी आम्ही केली आहे. मात्र अद्याप पूर्ण चौकशी झालेली नाही. यासंदर्भात पाच सदस्यीय समिती चौकशी करणार असून दोषींवर निश्चित स्वरूपात कारवाई केली जाईल.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image