सोयाबीन बियाणे वितरणाचे गौडबंगाल आहे तरी काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन बियाणे वितरणाचे गौडबंगाल आहे तरी काय ?

सोयाबीन बियाणे वितरणाचे गौडबंगाल आहे तरी काय ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


अकोला ः सोयाबीन बियाणे वितरणाबाबत महाबीजद्वारे (Mahabeej) योग्य माहिती दिली जात नसून, त्यांच्या डिलर्सकडूनही बियाणे उपलब्धतेबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे महाबीजच्या बियाणे वितरणात घोटाळ्याची शक्यता व्यक्त करून, साठेबाजी व अधिक दराने बियाणे विक्रीचे शडयंत्र होत असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचने बुधवारी (ता.१९) आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. (Shetkari Jagar Manch objected to the distribution of Mahabeej seeds)

गेल्या खरिपात अतिवृष्टी, अवकाळीचा फटका, रब्बीत उत्पादन निम्‍म्यावर, विम्याची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, कर्जमाफीचे भिजत घोंगडे, चुकारे रखडलेलेच, नुकसानभरपाईचा पत्ता नाही आणि दोन वर्षांपासून कोविडच्या संकटाने व लॉकडाउनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बाजार समित्या कधी बंद, कधी सुरू! शासकीय शेतमाल खरेदी नावालाच.

हेही वाचा: लहान मुलांना कोरोना, घाबरू नका! आहे स्वतंत्र व्यवस्था

लॉकडाउनमुळे शेतमाल विक्री करायची कुठे हा यक्ष प्रश्‍न. या व अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना विनामुल्य किंवा अत्यल्प दरात कृषी निविष्ठा शासनाने पुरवाव्या, अशी अपेक्षा होती. मात्र, याउलट रासायनिक खतांचे भाव दुप्पट करण्यात आले आणि आता तर, बियाणे उपलब्धतेवर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची बिकट स्थिती लक्षात घेऊन कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी यावर्षी सोयाबीन बियाण्याचे दर वाढवू नये असे निर्देश दिले होते.

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

त्यानुसार महाबीजद्वारे सोयाबीन बियाण्याच्या एका बॅगची किंमत २२५० रुपये ठरविण्यात आली. इतर खासगी कंपन्यांनी मात्र, त्यांचे सोयाबीन बियाण्याचे दर २८०० ते ३३०० रुपये ठेवले आहेत. त्यामुळे महाबीजचे बियाणे मिळविण्यासाठी शेकऱ्यांची धावपळ आहे. परंतु, अजूनपर्यंत महाबीजचे बियाणे उपलब्धच झाले नाही, बियाणे संपले, सबडिलर्सला सर्व बियाणे देऊन टाकले, अशी माहिती महाबीजचे डिलर्स देत असून, शेतकरी बियाणे मिळविण्यापासून वंचित राहात असल्याची माहिती शेतकरी जागर मंचच्या संयोजकांनी दिली.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

याबाबत महाबीजच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, कोणत्या डिलर्सला किती बियाणे वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित डिलर्स महाबीजच्या बियाण्याची साठेबाजी करीत असून, अधिक दराने ते विक्रीचे शडयंत्र आखत आहेत. या शडयंत्रात महाबीजच्या अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचने पत्रकार परिषदेत केला आहे. पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचचे कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदिश मुरमकार, दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे उपस्थित होते.

संपादन - विवेक मेतकर

(Shetkari Jagar Manch objected to the distribution of Mahabeej seeds)

loading image
go to top