मनपा स्थायी समिती सभेत गदारोळ, शिवसेनेचे गटनेत्यांनी केली सभागृहात तोडफोड

मनोज भिवगडे
Wednesday, 29 July 2020

घनकचरा व्यवस्थापन व पोकलॅंड मशिन खरेदीच्या खर्चाबाबतच्या माहिती देण्यावरून महानगरपालिका स्थायी समिती सभेत चांगलाच गदारोळ झाला. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी सभागृहात तोडफोड केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

अकोला  ः घनकचरा व्यवस्थापन व पोकलॅंड मशिन खरेदीच्या खर्चाबाबतच्या माहिती देण्यावरून महानगरपालिका स्थायी समिती सभेत चांगलाच गदारोळ झाला. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी सभागृहात तोडफोड केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थाप प्रकल्पाच्या निविदेवर मंगळवारी सभेत वादळी चर्चा झाली. चर्चेच्या प्रारंभी राजेश मिश्रा यांनी विद्यमान स्थितीत कचरा घंटा गाड्या, ट्रॅक्‍टर आणि पोकलॅन्ड मशिन आदींवर किती खर्च होत आहे, याबाबत माहिती विचारली. ही माहिती संबंधित अधिकारी नंतर देण्याचे सभापतींनी स्पष्ट केले. त्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली. या विषय सोडून बोलू नका, असे सभापती सतीश ढगे यांनी स्पष्ट केले. यावरुन राजेश मिश्रा आणि सभापती ढगे यांच्यात चांगलीच तु-तु मै-मै झाली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाद न मिटल्याने संतप्त झालेल्या राजेश मिश्रा यांनी मिनरल वॉटरच्या तीन बॉटल्स आणि दोन माईकची फेकफाक केली. राजेश मिश्रा संतप्त झालेले पाहून शिवसेनेचे शशीकांत चोपडे यांनीही टेबल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेश मिश्रा यांनीच त्यांना अडवले. या नंतर असा प्रकार घडल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. यावरुन सभेत बराच गदारोळ झाला.

सभेच्या प्रारंभीही वाद
सभेच्या प्रारंभी राजेश मिश्रा यांनी आमदार बाजोरीया यांनी घनकचरा व्यवस्थापना बाबत मागीतलेली माहिती का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता.जो पर्यंत याबाबत माहिती दिली जात नाही, तो पर्यंत इतर विषयावर चर्चा करु नका, अशी मागणी त्यांनी केली. यास भाजपचे विजय इंगळे, हरीश काळे, राहुल देशमुख, संजय बडोणे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, प्रथम विषयाची माहिती घ्या त्या नंतर प्रश्न विचारा तर सभापती ढगे यांनी सभेच्या अखेरीस ही माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले. यावरुनही भाजप-सेनेत चांगलाच वाद निर्माण झाला होता. अखेर कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी मी आमदार बाजोरीया यांच्या कार्यालयात जावून माहिती दिली, असे स्पष्ट केल्या नंतर हा वाद मिटला.

उचकेलेल्या रकमेचे समायोजन करा
स्वच्छतेसह विविध कामांसाठी उचल केलेल्या रकमांचे समायोजन येत्या पाच दिवसात करण्याचा अल्टिमेटम स्थायी समितीने कर्मचाऱ्यांना दिला.त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. काही कर्मचाऱ्यांनी दहा वर्षापासून या रकमेचे समायोजन केलेले नाही तर काही कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निविदेस मंजुरी
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निविदांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. राजेश मिश्रा, विजय इंगळे, राहुल देशमुख आदींनी यावर विविध प्रश्न उपस्थित केले. याबाबत कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पासाठी शहरात नायगाव, खडकी आणि उमरी स्मशान भूमीच्या मागील जागेत शहरातील कचरा संकलन केले जाणार आहे. या ठिकाणावरुन हा कचरा भोळ येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर पोचवला जाईल. त्या ठिकाणी घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, त्यातून खत निर्माती तसेच ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. भारिप-बमसंच्या किरण बोराखडे यांनी शहरात ज्या ठिकाणी हा कचरा संकलीत केला जाणार आहे,त्या परिसरात दुर्गंधी सुटली तर काय व्यवस्था करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. यावर हा कचरा टाकल्या नंतर त्वरित उचलला जाणार असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena group leader Rajesh Mishra vandalizes Akola Municipal Corporation Standing Committee meeting