श्रीगजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

श्रीगजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

शेगाव (जि. बुलडाणा) ः आपल्या कार्यकर्तृत्वाने संतनगरी शेगावचे नाव जगभरात पोहोचविणारे आध्यात्मिक सेवेचे दीपस्तंभ, ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून मानवतेसाठी आयुष्य वेचणारे श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांनी बुधवारी (ता. ४ ऑगस्ट) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास देह ठेवला. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भासह देश-विदेशातील गजानन भक्तांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता घरासमोरील शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शिवशंकरभाऊ यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे आणि बराच आप्त परिवार आहे. पाटील कुटुंबियांनी शिवशंकरभाऊंच्या निधनाची माहिती अधिकृतपणे जाहीर करून तसा शोकसंदेश वजा सूचनाफलक घराबाहेर लावला. सर्वांनी आपल्या घरूनच भाऊंना श्रद्धांजली अर्पण करावी, अशा आशयाचे आवाहन भाऊंचे सुपूत्र निळकंठ व श्रीकांत पाटील यांनी केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रतिष्ठित व्यक्ती आणि शासन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून श्रद्धांजली अर्पण केली. शेगावातील नागरिकांनी दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीगजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
शेगाव गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

अंत्यसंस्कार शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आजच सायंकाळी ७ वाजता पार पडला. करोनाची परिस्थिती असल्याने नातलग व मोजक्या लोकांच्या उपस्थितीतचबाळापूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानासमोरील शेतात अंतिम संस्कार पार पडले. शिवशंकरभाऊ यांचे पुत्र निळकंठदादा पाटील व श्रीकांतदादा पाटील यांनी मुखाग्नी दिला.

जीवन परिचय

कर्मयोगी शिवशंकरभाऊ सुकदेव गणेश पाटील उपाख्य भाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १९४० मधे झाला आहे. श्री गजानन महाराज संस्थानचे सन ३१-८-१९६२ विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. सन १९६९ ते १९९० पर्यंत ते गजानन महाराज संस्थानचे ४० वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच श्री गजानन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकीय कार्यकाळ बघता शिवशंकरभाऊ शेगाव नगरपालिकेचे सन १९७६ ते ८० या कालावधीत नगराध्यक्ष सुद्धा रहिलेले आहेत. श्री संत गजानन महाराज संस्थानचा निस्वार्थ कारभार सांभाळत असताना संस्थानच्या माध्यमातून शिवशंकरभाऊंनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक असे अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच भाविकांसह जनतेने त्यांना कर्मयोगी उपाधीने सन्मानित केले. वयाच्या अठराव्या शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्री नुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे.

शेगावच्या श्रीसंत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत समजून दु:ख झाले. विनम्र स्वभाव व नि:स्वार्थ सेवेकरिता परिचित असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांनी उत्तम मंदिर व्यवस्थापनाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र
शेगावच्या श्रीसंत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे. श्रीसंत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली व त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
श्रीसंत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्रीगजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला. संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
- नितीन गडकरी, केंद्रीय सडक वाहतूक व महामार्ग मंत्री
श्रीगजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल
शिवशंकर भाऊंच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com