शिरपूरचे जागृत व प्रख्यात देवस्थान श्री आई भवानी संस्थान

संतोष गिरडे
Sunday, 18 October 2020

येथील प्राचीन देवस्थान म्हणून श्री आई भवानी जगदंबा माता संस्थान हे जागृत व प्रख्यात आहे. येथे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

शिरपूर जैन (वाशीम) : शिरपूर जैन हे मालेगाव तालुक्यातील मोठे गाव आहे. येथील प्राचीन देवस्थान म्हणून श्री आई भवानी जगदंबा माता संस्थान हे जागृत व प्रख्यात आहे. येथे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्यात विशेष करून नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी वर्दळ येथे असते. या संस्थानला जागृत देवस्थान म्हणून सुद्धा परिसरात मान्यता आहे. 

हे ही वाचा : रस्त्यावरील फलकामुळे वाहन धारकात संभ्रम

शिरपूर येथे श्री भवानी संस्थान बरोबरच इतरही देव देवतांचे व संत महात्म्यांचे मंदिरे आहेत. मात्र यामध्ये अग्रगण्य श्री आई भवानी संस्थांन आहे. सदर संस्थान हे गावाच्या दक्षिण बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेले असून हे मंदिर अतिप्राचीन आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. येथील जानगीर महाराज संस्थांनचे तृतीय मठाधिपती प पू ओंकारगिर महाराज यांनी या उत्सवास सुरुवात केल्याचे गावकरी सांगतात. 

सदर मंदिर हे पूर्वी छोट्या स्वरूपात व प्राचीन होते. मात्र मा.आ.विजयराव जाधव यांनी सदर मंदिरास सभामंडप उभारून दिला व त्याच वेळी मंदिराचा मोठ्याप्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आला. या संस्थानातील देवीची मूर्ती ही रेणुका मातेसारखी असून मंदिराचे द्वार हे पूर्वाभिमुख आहे. तर मंदिर परिसरात बारमाही पाण्याचे बारव असून, समोरच अति प्राचीन दीपमाला आहे. सदर संस्थान परिसरात जागृत संस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. 

हे ही वाचा : निम्मा खर्च, उत्पन्न तिप्पट!, उत्तमराव आणि लताबाई यांनी पिकविले एकरी दहा क्विंटल सोयाबीन

सध्या नवरात्र उत्सव सुरू झाल्याने संस्थांनच्या वतीने शासनाचे नियमाचे पालन करून उत्सव प्रारंभ झाला आहे. (ता १७) रोजी सकाळी सहा वाजता संस्थांनचे प्रमुख गजानन तायडे (देशमुख) यांच्या हस्ते आई भवानीची पूजा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात येथे दरवर्षी गर्दी असते. मात्र यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता संस्थानच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी नवरात्रोत्सव साध्या व मोजक्याच प्रमाणात करण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे यावर्षी येथे भाविकांची वर्दळ दिसून येत नाही. या मंदिराला फार पुरातन इतिहास लाभलेला असल्याचे वयोवृद्ध मंडळी व जाणकारांकडून सांगण्यात येते. श्री आई भवानी मंदिर परिसरात श्री गजानन महाराज मंदिर, श्री बलखंडी हनुमान मंदिर तसेच महादेवाचे मंदिर आहे. देशमुख परिवाराच्या वतीने मंदिराचा कारभार चालवण्यात येतो.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri I Bhavani Jagdamba Mata Sansthan in Shirpur Jain village is well known and renowned