रस्त्यावरील फलकामुळे वाहन धारकात संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

धरमपुरी हे नव्याने जन्माला आलेले गाव तर नाही ना? त्यावरुन नागरिकांत चर्चा रंगत आहेत. शिरपूरकरांच्या नजरेत किंवा स्मरणात आत्तापर्यंत धरमपुरी हे गाव आलेच नसल्याचे अनेक जणांकडून कळते. तेव्हा संबंधित विभागाने या गावाचा शोध लावला तरी कसा व कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शिरपूर जैन (वाशीम) : मालेगाव ते शेनगाव या महामार्गाचे काम सुरू असून मालेगाव पासून रिसोड रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. रस्त्यावरील विविध फलक लावण्याचे काम सुरू आहे. शिरपूरजवळ एक फलक लावण्यात आला. त्यावरील गावाचे नाव वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. या फलकामुळे नागरिक संभ्रमात पडले असून यावरील लिखित गावाचा जन्म कधी झाला? असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करीत आहेत.

हे ही वाचा : नीट परीक्षेत अकोल्यातून तेजस राठोड अव्वल

मालेगाव कडून शिरपूर व पुढे रिसोडकडे सदर महामार्ग जातो. महामार्गाचे काम देगावच्या पुढे झाले आहे. उर्वरित रस्त्याचे कामही सुरू आहे. दरम्यान तयार झालेल्या रस्त्यावरील फलक, गावाच्या नावाचे दगड, पांढरे पट्टे, रेडियम लावण्याचे काम सुरू आहे. गावाच्या नावाचे मार्ग दाखवणारे फलकही लावण्यात येत असताना, शिरपूर ते रिसोड रोडवर चांडस फाट्यावर शिरपूर, चांडस, धरमपुरी असे लिहिलेला एक मोठा फलक आहे. यातील चांडस, शिरपूर दर्शवले हे योग्य आहे. मात्र धरमपुरी हे कोणते गाव या भागात आहे? असा प्रश्न अनेक नागरिकांना व वाहन धारकांना पडला आहे.

हे ही वाचा : 'नीट' परीक्षेचा निकाल तर आला, आता पुढे काय? 

धरमपुरी हे नव्याने जन्माला आलेले गाव तर नाही ना? त्यावरुन नागरिकांत चर्चा रंगत आहेत. शिरपूरकरांच्या नजरेत किंवा स्मरणात आत्तापर्यंत धरमपुरी हे गाव आलेच नसल्याचे अनेक जणांकडून कळते. तेव्हा संबंधित विभागाने या गावाचा शोध लावला तरी कसा व कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच शिरपूर- मालेगाव रस्त्यावरून पांगरीकुटे येथे जाण्यासाठी मार्ग नाही असे अनेकांचे मत आहे.

सदर पांगरी कुटे हे गाव मालेगाव मेहकर रोडवर आहे. तेव्हा या रस्त्यावर भेरा फाट्यावर पांगरी कुटे गाव दर्शवणारा फलक असून, या फलकामुळे देखील अनेक वाहनधारक संभ्रमात पडले आहेत. हे चुकीचे फलक असतील तर त्यामुळे वाहनधारकांत संभ्रम निर्माण होतो. तेव्हा फलकांची सत्यता तपासूनच फलक लावण्यात यावेत. जेणेकरून वाहनधारकांची दिशाभूल होणार नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A plaque was erected near Shirpur Many were shocked to read the name of the village on it