महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना वीरमरण; संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात शोकाकुल वातावरण 

अरुण जैन 
Wednesday, 16 December 2020

वडिलांचा आधार हरपलेला, त्यामुळे घरात कर्त्या पुरुषाची भूमिका देखील निभावणारे वीर जवान प्रदीप मांदळे शहीद झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला काल 15 डिसेंबरला रात्री कळवण्यात आली. घटनेने हे कुटुंब अक्षरशः हादरले. 

दुसरबीड (जि. बुलडाणा) :  भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप साहेबराव मांदळे  कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात शहीद झाल्याची घटना 15 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. त्यांचे मूळ गाव पळसखेड चक्का ता.सिंदखेडराजा आहे.

वडिलांचा आधार हरपलेला, त्यामुळे घरात कर्त्या पुरुषाची भूमिका देखील निभावणारे वीर जवान प्रदीप मांदळे शहीद झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला काल 15 डिसेंबरला रात्री कळवण्यात आली. घटनेने हे कुटुंब अक्षरशः हादरले. 

हेही वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

ही माहिती  गावात मिळाल्यानंतर पळसखेड चक्का गावातील राहिवासी देखील गहिवरले. वडील साहेबराव मांदळे यांनी मोलमजुरी करून मोठा पुत्र प्रदीप, संदीप व सैन्यातच कार्यरत धाकटा पुत्र विशाल यांना शिक्षण दिले. त्यातील प्रदीप 2008-09 मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. कांचन हिच्याशी लग्न केल्यावर त्याच्या जीवन वेलीवर सुरज, सार्थक, जयदीप ही गोंडस मुले आहेत. 

या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक बोर्ड यांच्याकडे विचारणा केली असता अधिकृत कुठलीही माहिती प्राप्त झाली नसली तरी जवान शहिद झाल्याची माहिती मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे.

क्लिक करा -सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

ती भेट ठरली अखेरची...

शहिद जवान प्रदीप मांदळे हे गत ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांच्या सुटीवर गावी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह ती अल्प सुटी घालविली. मात्र ती भेट शेवटची ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल, पण दुर्दैवाने ती अखेरचीच भेट ठरली

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier drom Buldhana district Martyred on border