esakal | गरिबांसाठी गोंदिया, वाशीमचे धान्य!
sakal

बोलून बातमी शोधा

गरिबांसाठी गोंदिया, वाशीमचे धान्य!

गरिबांसाठी गोंदिया, वाशीमचे धान्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात केंद्रीय वखार महामंडळासह शासनाचे इतर मोठे गोदाम असल्यानंतर सुद्धा गरिबांसाठी गोंदिया व वाशीम येथून धान्याची उचल करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी या जिल्ह्यातील गोदामांवर मोफतच्या धान्य वाटपाची मदार आहे. त्यामुळे स्थानिक गोदामांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सदर धान्याची उचर शासनाच्या निर्देशाप्रमाणेच करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. (Supply of free foodgrains from the Prime Minister's Poor Welfare Scheme)

हेही वाचा: कपाशी घटली, सोयाबीन, तूर पिकांचा बोलबाला

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर गरीबांची रोजी गेली असली तर त्यांना रोटी मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांना मे व जून महिन्यांत मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरीबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबरपर्यंत वाढविली होती. परंतु त्यासाठीचे धान्य जिल्ह्याला प्राप्त झाले नव्हते. दरम्यान जून महिन्याच्या शेवटी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत धान्य वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी धान्य साठा सुद्धा मंजुर केला आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु सदर धान्याची उचल पुरवठा विभागाला वाशिम आणि गोंदिया येथून करावी लागत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून लाभार्थ्यांना वाशीम येथील शासकीय गोदामातून आणलेला गहू तर गोंदिया येथून आणलेल्या तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्यात स्थानिक गोदामातून पुरवठा होत असतानाच आता गोंदिया व वाशीम येथून धान्याची उचल होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप


असे आहे शासनाने मंजुर केलेले धान्य
- जिल्ह्यासाठी प्राधान्य गट योजनेतील ११ लक्ष १६ हजार ७५३ लाभार्थ्यांना ३३ हजार ५४०० क्विंटल गहू, २२ हजार ३३० क्विंटल तांदूळ शासनाने मंजुर केला आहे.
- अंत्योदय योजनेत १८ लक्ष ९ हजार ११ लाभार्थ्यांना ५६७० क्विंटल गहू व ३७८० क्विंटल तांदूळ इतके नियतन मंजूर करण्यात आले आहे.


केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांना मोफतचे धान्य देण्यात येणार आहे. त्यासाठीचा धान्य साठा मंजुर झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार गोंदिया येथील शासकीय गोदामातून तांदुळ व वाशीम येथील शासकीय गोदामातून गव्हाची उचल करण्यात येत आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर

Supply of free foodgrains from the Prime Minister's Poor Welfare Scheme

loading image