विनापरवानगी मोर्चा काढणे भोवले; दोनशे जणांविरुद्ध गुन्हे | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विनापरवानगी मोर्चा काढणे भोवले; दोनशे जणांविरुद्ध गुन्हे

मोताळा (जि. बुलडाणा) - त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ मोताळा येथे मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. दरम्यान, विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल बोराखेडी पोलिसांनी जवळपास दोनशे जणांविरुद्ध शुक्रवारी (ता.12) रात्री पावणे बारा वाजता गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रजा अकॅडमीने शुक्रवारी बंदची हाक दिली होती. दरम्यान, मोताळा येथील मुस्लिम समाजबांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवली. तसेच त्रिपुरा घटनेतील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.12) दुपारी नमाजनंतर मुस्लिम समाजबांधवांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले.

हेही वाचा: बार्शीटाकळी : सोयोबीन खरेदी विक्रीला सुरवात

दरम्यान, नापोकाँ रमेश अरविंद नरोटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरिफ खान बिबन खान रा. धामणगाव बढे, रफिक कुरेशी, सय्यद अजहर, मोहसीन खान, मो. अकबर, अ. शकील अ. अजीज, शेख आरिफ शेख शरीफ, शेख जब्बार शेख मुसा, शेख इरफान, शेख नदीम, जफर हुसेन, बाबा कुरेशी व इतर 150 ते 200 जणांनी मोर्चा व आंदोलनाला कोणतीही परवानगी नसताना शुक्रवारी दुपारी तीन वाजता खरबडी फाटा येथून मूक मोर्चा काढला. कोविड संदर्भात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता विनापरवाना मूक मोर्चा काढून जिल्हा दंडाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी नापोकाँ रमेश अरविंद नरोटे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोहेकाँ राजेश आगाशे करीत आहेत.

loading image
go to top