सेवा समाप्ती करा, फाशी द्या, पण माघार नाही! आंदोलनकर्ते आक्रमक | akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा समाप्ती करा, फाशी द्या, पण माघार नाही! आंदोलनकर्ते आक्रमक

सेवा समाप्ती करा, फाशी द्या, पण माघार नाही! आंदोलनकर्ते आक्रमक

बुलडाणा : गेल्या ८ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या बेमुदत संप आता आक्रमक होत असून, बुलडाणा राज्य परिवहन महामंडळ विभागातील प्रशासनाने १० व ११ नोव्हेंबर या दोन दिवसात ६५ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले असून, सेवा समाप्ती करा, फाशी द्या पण आता माघार नाही अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विविध राजकीय आणि सामाजिक संघटनेचे पाठिंबा मिळत आहे.

बुलडाणा विभागातील सातही आगारातील वाहतूक ८ नोव्हेंबरपासून ठप्प झाली आहे. यामुळे ४२० दैनंदिन फेऱ्या पूर्णत: बंद झाल्या असून, यामुळे महामंडळाचे जवळपास २ कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, यामुळे जनसामान्यही कंटाळले असून, शासनाने काय तो निर्णय घेत सर्वसामान्य नागरिकांना या अडचणीतून बाहेर काढावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: एकादशी निमित्त मिरज- बिदर पॅसेंजर गाडी धावणार

तीन दिवसांपासून सातही आगारातील कर्मचारी थंडी- वाऱ्‍याची तमा न बाळगता विलीनीकरणाची प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आगार परिसरात आंदोलनाला बसले आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मेहकर येथे वकिलांनीही पाठिंबा दर्शवीत लढ्यात सहभागी असल्याचे सांगितले. आगार परिसरात असलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपाला विविध राजकीय आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देत पाठिंबा दर्शविला आहे.

आ. गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना कामाचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतनही चेष्टा करण्यासारखे आहे. अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याने एसटी महामंडळ तोट्यात आले आहे. एसटी म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या न्याय मागण्यांसंदर्भात हिवाळी अधिवेशनात विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडावा. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला समर्थन देऊन ठराव एकमताने पारित करावा, असे आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

loading image
go to top