esakal | विद्यार्थ्यांची क्षमता सेतू कोर्समधून तपासणार
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांची क्षमता सेतू कोर्समधून तपासणार

विद्यार्थ्यांची क्षमता सेतू कोर्समधून तपासणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा ः मार्च २०२० पासून शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले होते. सन २०२०-२१ हे पूर्ण सत्र ऑनलाइन शिक्षणात गेले. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ हे घोषवाक्य ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शिकवण्यात आले; पण ते किती शिकले? त्यांच्यामधील कच्चे दुवे कोणते? हे शोधण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला. हा अभ्यासक्रम शाळा सुरू झाल्यापासून ४५ दिवसात पूर्ण करायचा आहे. (The ability of the students will be tested from the Setu course)


गतवर्षी कोरोनाच्या असामान्य परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या शाळा पूर्णपणे बंद होत्या. त्यांना शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन केले. त्याची परिणामकारकता तपासण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने पंचेचाळीस दिवसाचा ब्रिज कोर्स तयार केला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांकडून कृतीपत्रिका सोडवून घेतली जाईल.

हेही वाचा: बाजार समितीतील व्यवहार तिसऱ्या दिवशीही बंद

सध्या विद्यार्थी ज्या वर्गात आहे, त्याच्या मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांच्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कितपत विकसित झाल्या हे तपासण्यासाठी तालुक्यातील सर्वच शाळांमधून सेतू अभ्यासक्रम अध्यापनाचे कार्य सुरू झाले आहे. क्षमता तपासण्यासाठी या ४५ दिवसात तीन चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. त्यामधून विद्यार्थी ऑनलाइनद्वारे कितपत शिकले, त्यांना अडचणी कुठे येतात, याची माहिती मिळेल. येणाऱ्या अडचणी दूर करून नवीन वर्गाचा अभ्यासक्रम समजण्यास सोपे होईल. हे काम नियमित व्हावे यासाठी तालुक्यामध्ये असणाऱ्या केंद्र शाळेच्या प्रमुखांनी आपापल्या केंद्रातील दुसरी ते दहावीच्या शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी तेल्हारा यांच्या मार्गदर्शनानुसार सूचना दिल्या आहेत. बहुतेक शाळांमधील शिक्षक ब्रिज कोर्स पूर्ण करत आहेत.

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; निवडणुकीचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात


तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये ब्रिज कोर्सचे अध्यापण सुरू आहे, त्यांची नीट अंमलबजवणी व्हावी, यासाठी नियोजन केलेले आहे. ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल.
- दिनेश दुतंडे, गटशिक्षणाधिकारी, तेल्हारा

The ability of the students will be tested from the Setu course

loading image