धोक्याची घंटा; म्युकरमायकोसीसचे आढळले तब्बल बारा रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mucor-mycosis

धोक्याची घंटा; म्युकरमायकोसीसचे आढळले तब्बल बारा रुग्ण

विदर्भातील काही जिल्ह्यात अनेक बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोरोना आजाराशी दोन हात करून या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांवर ‘म्युकरमायकोसीस’ या आजाराने हल्ला चढविला

वाशीम : मागील वर्षीपासून कोरोना या जीवघेण्या संसर्गाने मृत्यूचे तांडव माजविल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या आजाराच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू दर कमालीचा वाढल्याने शासन, प्रशासनाने आटोकाट प्रयत्न करून या आजाराच्या प्रसारावर बऱ्यापैकी यश मिळविले. परंतु, या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांवर आता (ब्लॅक फंगस) अर्थात ‘म्युकरमायकोसीस’ या आजाराने हल्ला चढविला. वाशीम जिल्ह्यात या आजाराने एका महिलेचा बळी घेतल्यानंतर या संसर्गाने आपले हातपाय पसरविण्यास सुुुरुवात केली असून, आजघडीला जिल्ह्याात १२ रुग्णांना या संसर्गाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (Twelve patients diagnosed with Washim mucormycosis; Death of one)

हेही वाचा: ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी उपाययोनामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात बऱ्यापैकी यश आले असून, आजघडील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे समाधानकारक चित्र समोर येत असल्याने जनसामान्य सुखावले होते. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, आरोग्य प्रशासनासह जनसामान्यांच्या चिंतेत भर पडली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम बालकांवर होणार असल्याचे सांगण्यात येत असताना, विदर्भातील काही जिल्ह्यात अनेक बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Video:पीएम किसानच्या दोन हजार रुपयांसाठी शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात! बँकांमध्ये उसळली गर्दी

दरम्यान, कोरोना आजाराशी दोन हात करून या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांवर ‘म्युकरमायकोसीस’ या आजाराने हल्ला चढविला. या बुरशीजन्य आजाराने रुग्णांना डोळे, जबडे गमविण्याची वेळ आली असून, मेंदूपर्यंत पोहचल्यानंतर रुग्ण दगावण्याचा धोका अधिक आहे. स्टुराईडस व इतर काही औषधींच्या इंजेक्शनच्या माऱ्यामुळे हा आजार बळावत असून, मधुमेही रुग्णांना या संसर्गाचा धोका अधिक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. आतापावेतो १२ जणांना या आजाराची बाधा झाली असून, यापैकी सात जणांनी यावर मात केली. चौघांवर उपचार सुरू असून, एका महिलेला जीव गमवावा लागला.

हेही वाचा: लहान मुलांना कोरोना, घाबरू नका! आहे स्वतंत्र व्यवस्था

कोरोनानंतर आता या नवीन आजाराने नागरिक भयभीत झाले असून, कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी उपाययोजनाबाबत काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. या नवीन आजाराबाबत तज्ज्ञांमध्येही मतेमतांतरे व्यक्त केले जात असून, या आजारावरील औषधाबाबतही भरमसाठ किंमती सांगीतल्या जात असल्याने जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर हा आजार असल्याची वंदता पसरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने याबाबत सूचना निर्गमित करण्याची गरज आहे.

मोफत उपचाराचे काय ?
पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘म्युकरमाकोसीस’ या आजाराला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची घोषणा केली होती, मात्र याबत रुग्णांना माहिती नसल्याची बाब समोर येत आहे. या योजनेत अडीच लाखांपर्यत वैद्यकीय देयक शासनाकडून देय असून, या आजाराचा उपचार शासकीय रुग्णालयातच होणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयामध्ये उपचार होत असतील तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे थेट नियंत्रण गरजेचे असून, या आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये ‘म्युकरमायसोसीस’ या आजाराचे बारा रुग्ण आढळले आहेत. कोरोना काळात प्रतिजैविकांचा वापर होत असताना जे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या आजारावरील औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. लक्षण आढळल्यास रुग्णांनी त्वरीत उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. या आजारातून काही रुग्ण बरे झाले आहेत.
-डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम.

संपादन - विवेक मेतकर

Twelve patients diagnosed with Washim mucormycosis; Death of one

loading image
go to top