Akola Agriculture Loss
Akola Agriculture LossSakal

Rain : अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही फटका!

अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अकोला - अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता २९ व ३० नोव्हेंबर रोजी येलो अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वीज गर्जना होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाशीममध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, शंभरावर मेंढ्या दगावल्या

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत मंगळवारी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कापूस, तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाल्यांसह फळबागांना चांगलाच फटका बसला आहे.अशात विदर्भात लाखो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अवकाळीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला असून तातडीने पंचनामे करुन मदतीची मागणी होत आहे.पावसामुळे वातावरणात गारठा वाढला असून अनेक जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पहायला मिळाली. एकंदरीतच विदर्भात कमी जास्त प्रमाणात अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २८ मिमी पाऊस झाला. दोन दिवसांत जिल्ह्यात ४१ मिमी पाऊस झाला असून तापमानात चांगलीच घट येऊन गारठा वाढला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे ताणावरील संत्रा बागांना धोका निर्माण झाला असून ऐन हंगामात संत्र्याची फूट कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संत्रापट्टा असलेल्या मोर्शी, वरुड, अचलपूर व चांदूरबाजार या तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे.

चंद्रपूर - जिल्ह्यातील अवकाळी मुळे धान, कापूस, तुरी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात १३ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावरील धानाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पडलेल्या पावसाचा जिल्ह्यातील ९९ गावांना फटका बसला. ३२ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

भंडारा - जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झले आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजतापासून येथे मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. यावेळी जिल्ह्यात धान कापणी व मळणीची कामे सुरू आहेत. शेतात कापी करून सुकविण्यासाठी ठेवलेल्या धानाच्या कळपा ओल्याचिंब झाल्या आहेत.

तसेच खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतात व घरासमोर ठेवलेली धानाची पोती ओली झाली आहेत. यामुळे धानाला कोंब येऊन नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय शेतातील तूर, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

गोंदिया - जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यात शेतात पडून असलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या असून, या कडपांना अंकुर फुटण्याची शक्यता आहे. या पावसाचा भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. तूर, मूग, उडीद या पिकांवर कीड लागण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

वाशीम - मंगळवारी पहाटेही संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. ४४ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी रिसोड तालुक्यातील काही गावात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने तुर, हरभरा व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अकोला - जिल्ह्यात अवेळी पावसाने शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने सविस्तर पंचनामे व सर्वेक्षण करावे, तालुकास्तरावर संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे चार हजार ६०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अकोला तालुक्यात चार हजार ५७६ हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे , तर तेल्हारा तालुक्यात ३२ हेक्टरवर भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.

वर्धा - वर्धा जिल्ह्यात दोन दिवसात सरासरी १२.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळपासून दुपारपयर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. यात सर्वाधिक पावसाची नोंद कारंजा आणि आष्टी तालुक्यात झाली. या भागात आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.

पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. धुके पडत असल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकावरही मोठा परिणाम झाला आहे.

यवतमाळ - मंगळवारी (ता.२८) जिल्ह्यात १६.८ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत ४४ मिमी पाऊस कोसळला आहे. अवकाळी पावसाने कापूस, तूर, हरभरा या पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुसद तालुक्यातील पुसद मंडळांत ८६.२७, पावसाची नोंद झाली आहे. हजारो हेक्टरवरील कापूस पीक मातीमोल झाले असून, तूर पीक जमिनीवर कोसळली आहे.

बुलडाणा - जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेरा तालुक्यांतील २९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल २८७ गावे बाधित झाले आहे. लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील ३३ हजार ९५१.३० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, तूर, गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाला, फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

गडचिरोली - मंगळवारी एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळल्याने शेतात कापून ठेवलेले धान भिजून नुकसान झाले आहे. थंडीची तिव्रताही वाढली आहे.

बैल,मेंढ्या ठार

पुसद तालुक्यात वीज पडून चिखली येथे एक बैल तर शेंबाळपिंपरी येथे पाच मेंढ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. तालुक्यातील १८९ गावे अवकाळी पावसाने बाधित झाले. एकूण १९ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकांचे नुकसान झाले. एकूण चार हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील तूर पीक पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर लोळले.

एकूण तीन हजार ७०६ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान झाले. एकूण दोन हजार ३४० हेक्टर क्षेत्रावरील गहू पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ५७ मिलीमीटर पाऊस झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com