esakal | मुहूर्त हुकला; लसीकरण विलंबाने!

बोलून बातमी शोधा

मुहूर्त हुकला; लसीकरण विलंबाने!
मुहूर्त हुकला; लसीकरण विलंबाने!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

१८ वर्षांवरील नागरिकांचे लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण

अकोला : कोरोनावर लसीकरण हाच रामबाण उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्यामुळे व राज्य शासनाने अद्याप लस खरेदीची प्रक्रियाच सुरू न केल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे १ मे पासून लसीकरण करता येणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर जनतेने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा मुहूर्त हुकणार असून लांबलेले लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागेल.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजीपासून कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन्ही गटातील लाभार्थ्‍यांची संख्या अधिक असल्याने लसीकरणाला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारने दिलेला मुहूर्त हुकणार असून नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

हेही वाचा: योद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा!

गर्दी केल्यास संचारबंदी कायद्याअंतर्गत कारवाई

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या नावाची कोविन पोर्टलवर नोंदणी झाली म्हणजे लसीकरण होणार असे नाही. लसीकरणाची वेळ व तारीख ही नंतर कळविण्यात येईल. त्यामुळे कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असा इशरा सुद्धा प्रशासनाने दिला आहे.

कोव्हिशील्डचे ९ हजार ६०० डोज मिळाले

कोरोना लसीकरण अधिक वेगाने व्हावे यासाठी जिल्ह्यासाठी कोव्हिशील्ड लशींचे ९ हजार ६०० डोज प्राप्त झाले आहेत. यापूर्वी २५ एप्रिल रोजी कोव्हिशील्डचे २० हजार डोज मिळाले होते. दरम्यान लशींचा साठा मिळताच जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लसीसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.

संपादन - विवेक मेतकर