Washim : मिनी मंत्रालयाच्या कारभाऱ्याची शुक्रवारी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

वाशीम : मिनी मंत्रालयाच्या कारभाऱ्याची शुक्रवारी निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम - ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी गत महिन्यात जिल्हा परिषद १४ गट व पंचायत समितीच्या २७ गणांची पोटनिवडणूक झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. १९) रोजी आणि रिसोड, मंगरुळपीर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. वाशीम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर, रिसोड पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी आणि मंगरुळपीर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे.

निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मागील सत्तेच्या गणिताची फेरमांडणी होणार असून, अध्यक्षपदासह एक सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, एक सभापतीपद शिवसेनेकडे राहणार असल्याची चर्चा आहे. ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर रिक्त झालेल्या वाशीम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ गटातील व पंचायत समितीच्या २७ गणांतील सदस्यांची पदे रिक्त झाली. यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचेही पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी ऑक्टोबर महिन्यात पोट निवडणूक झाली.

पोट निवडणुकीनंतर ही रिक्त पदे कोणत्या प्रवर्गासाठी सुटतात? व कोणाची या पदांवर वर्णी लागणार? याची चर्चा महिनाभर राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर मंगळवारी (ता.१६) जिल्हाधिकाऱ्यांनी या रिक्त पदाचे आरक्षण व निवडणूक कार्यक्रम घोषित केला. कार्यक्रमानुसार वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. वाशीम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

हेही वाचा: अकोला : चालकाने पोलिसाच्या अंगावर घातला आयशर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाशीम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी कायम राहणार असल्याने कोणताही चमत्कार होणार नसल्याची चर्चा आहे. तर, भाजप, जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

पोट निवडणुकीपूर्वीचे सदस्य संख्या

- राष्ट्रवादी काँग्रेस - १४

- काँग्रेस - ११

- जनविकास आघाडी - ६

- वंचित बहुजन आघाडी - ६

- शिवसेना - ६

- स्वाभिमानी शेतकरी संघटना - १

- अपक्ष - १

पंचायत समित्यांमधे होणार सत्तापालट

जिल्ह्यातील मंगरुळपीर, रिसोड पंचायत समितीचे सभापती पद तर, कारंजा व मानोरा पंचायत समितीचे उपसभापती पदे सध्या रिक्त आहेत. या रिक्त पदाच्या निवडणुकीकरिता १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी तर, रिसोड पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

loading image
go to top