अ‍ॅग्रो

‘केकतउमरा’ गावाचा कापूस बीजोत्पादनात हातखंडा 

गोपाल हागे

वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून या गावातील शेतकरी कापूस बीजोत्पादनात अाघाडीवर आहेत. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटरवर हे गाव अाहे. त्याचे शिवार सुमारे १२५७.७८ हेक्टर अाहे. लोकसंख्या साडेतीन हजारांवर पोचली अाहे. विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर हा भाग येतो. शेती हाच येथील अर्थकारणाचा मुख्य गाभा अाहे. 

 बीजोत्पादनात चढाअोढ 
अाजचा शेतकरी सातत्याने नव्याच्या शोधात अाहे. नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने कमी क्षेत्रातही अधिक उत्पादन घेणारे शेतकरी तयार झाले अाहेत. याचे चांगले उदाहरण केकतउमरा गावाचे देता येईल. खासगी कापूस बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उत्पादित करून देण्यात या गावातील शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा अाहे. बाजारपेठेत कापूस विकण्यापेक्षा बीजोत्पादनाद्वारे चांगला पैसा हाती येतो. त्यामुळे गावात दरवर्षी बीजोत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत अाहे. तसाच कंपन्यांचाही कल गावाकडे झुकतो अाहे. कापूस बियाणे उत्पादनात अग्रेसर प्रमुख कंपन्यांमध्ये त्यामुळे चढाअोढ दिसून येते.  

क्विंटलला १६ हजार रुपये दर 
सध्याचा काळ बीटी कापूस वाणाचाच असल्याने यात वाणांचे बीजोत्पादन शेतकऱ्यांना करावयाचे असते. साधारण एक प्लाॅट हा ३० गुंठ्यांचा असतो. यात पाच ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते. कंपन्या खरेदीसाठी अाधीच दर ठरवून देतात. गुणवत्ता व उगवणक्षमता चांगली असली तर जादाचे पैसेही देतात. साधारणतः १५ हजार, १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर बीजोत्पादकांना दिला जातो. गावातील असंख्य शेतकरी या शेतीत असल्याने बीजोत्पादनाद्वारे दरवर्षी काही कोटी रुपये गावात निश्चित येत असतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

शेतकरी झाले निष्णात 
 अनेक वर्षांपासून बीजोत्पादनात असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी लागणारे बारकावे शिकून घेतले. कंपन्यांचे मार्गदर्शन, अभ्यास व अनुभव यांच्या आधारे हे शेतकरी नवनवीन बाबी अवगत करीत असतात. गावातील जवळपास प्रत्येकाकडे कापूस बीजोत्पादन क्षेत्र आहेच. शिवाय प्रत्येक कुटुंब त्यात राबताना दिसते. 

बीजोत्पादनातील महत्त्वाच्या बाबी 
-लागवडीचे अंतर साधारणतः सहा बाय एक फूट 
-सुरवातीला स्प्रिंकलरच्या साह्याने व नंतर पाटपद्धतीने पाणी दिले जाते. 
-लागवडीनंतर दोन महिन्यांनंतर परागसिंचनाचे मुख्य काम. हे काम एक महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे कपाशीच्या झाडांवर फुले उमलत असतात तोवर सुरु ठेवले जाते. शेतकरी दररोज प्लॉटमध्ये फिरून प्रत्येक फुलाला परागसिंचन होईल याची काळजी घेतो.

    दर्जेदार उत्पादनाची धडपड 
बियाणे कंपन्या दर्जेदार कापूसच घेतात. त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ झाली असेल तर हे बियाणे स्विकारले जात नाही. असे करार करण्यापूर्वीच सांगण्यात येते. यामुळे शेतकरी लागवडीच्या सुरवातीपासून वेचणी, काढणीनंतरची कामेही डोळ्यात तेल घालून काम करतात. बियाण्याची लागवड केल्यानंतर काही झाडे नर अाढळली तर ती उपटून टाकली जातात. परागसिंगनासाठी नर जातीची फुले हवी असतात. मात्र वेगळ्या अोळींमध्ये हा कापूस पेरतात. वेचणी सुरु झाल्यानंतर प्रत्येकवेळी कापूस व्यवस्थितरित्या वाळवून गंजीवर टाकण्यात येतो.  

हरिमकार यांचा मोठा अनुभव  
शिवाजी हरिमकार यांची १८ एकर शेती अाहे. पंधरा वर्षांपासून ते दरवर्षी दीड एकरांत बीजोत्पादन घेतात. तेवढ्या क्षेत्रात त्यांना १० ते १२ क्विंटल बीजोत्पादन मिळते. क्विंटलला १६ हजार ते २० हजार रुपये दर मिळतो असे ते सांगतात. त्यासाठी येणारा उत्पादन खर्च हा किमान ५० हजार रूपये किंवा त्याहून अधिक असतो. सध्या ते एकाच कंपनीसाठी बीजोत्पादन करतात. सुमारे आठ महिन्यांनी त्याचे पैसे मिळतात. ते म्हणतात की कापूस बाजारपेठेत विकला तर क्विंटलला ४००० रुपये दर मिळतो. त्या तुलनेत बिजोत्पादनातून १६ हजार रुपयांचा दर मिळवता येतो. हे काम काळजीपूर्वक करायचे आहे. पण ते शक्य केले की पुढील गोष्टी सोप्या होतात. 

वानखडे यांचा अनुभव 
भागवत वानखडे यांची अवघी दीड एकर शेती अाहे. ते दरवर्षी एक एकरात बीजोत्पादन घेतात. दांपत्य यामध्ये राबते. विष्णू नारायण वाढ हे देखील १५ वर्षांपासून बिजोत्पादन घेत अाहेत. या शेतीने अामच्या गावात समृद्धी अाणली. उत्पन्नाची खात्री दिली. दैनंदिन जीवनात या पीकपद्धतीमुळे मोठा बदल झाला. घरातील सुख-दुःखाच्या प्रसंगात पैसा शक्यतो कमी पडत नाही. कुणाकडे उधार मागण्याची अावश्यकता राहिलेली नाही असे विष्णू वाढ छातीठोकपणे सांगतात.   

परागसिंचनाचे तंत्र 
नर व मादी झाडांची वेगवेगळी लागवड करावी लागते. बीजोत्पादनात परागसिंचनाला अनन्यसाधारण महत्व राहते. ती योग्य होण्यावर उत्तम बियाणे निपजते. परागसिंचनासाठी नर जातीचे फूल मादी जातीच्या फुलावर घासले जाते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊही देखील असते. केकतउमरा गावातील काही शेतकऱ्यांनी त्याचे विशिष्ट तंत्र वापरले आहे. ते नर जातीची फुले तोडून अाणतात. ती वाळवून त्यातील परागकण एकत्र करतात. त्यास ते पावडर म्हणतात. छोट्याशा डबीत हे परागकण भरून मादी जातीच्या फुलांवर घासले जातात. या पद्धतीमुळे मजुरांचा वेळ वाचतो. कामात गती येते.  

शिवाजी ज्ञानबा हरिमकार, ७०६६५२११८१,  विष्णू नारायण वाढ, ८६९८४६३०७६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT