अ‍ॅग्रो

कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक

मुकुंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष पालखेडे यांची द्राक्षबाग गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नुकसानीत गेली. मग हे पीक थांबवून अभ्यास करून चवळी पिकाचा पर्याय उभा केला. उन्हाळी हंगामात कमी खर्चात दरवर्षी साडेचार एकरांतील या पिकाने त्यांना मोठा आधार देत आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे काम केले आहे.

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर (ता. नाशिक) येथील संतोष पालखेडे यांची वडिलोपार्जित १५ एकर शेती आहे. पूर्वी संपूर्ण क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व्हायचे. २००१ मध्ये गारपिटीचा जोरदार तडाखा बागेला बसला. मोठे नुकसान झाले. यातून सावरून पुन्हा बागेच्या काड्या तयार केल्या, पण पुढे डाऊनी, भुरी यांसारखे रोग बागेची पाठ सोडेनात. मोठा खर्चही होऊ लागला. हाती काहीच येईना. अखेर हे पीक घेणे थांबवण्याच्या निर्णयापर्यंत संतोष आले. 

चवळीचा पर्याय 
द्राक्ष नाही तर मग पर्याय काय, असा प्रश्‍न उभा राहिला. भांडवल उपलब्ध नसल्याने कमी भांडवलावर नवीन पीकपद्धती विकसित करणे क्रमप्राप्त होते. अभ्यास व शोध सुरू झाला. यातून सुरवातीला टोमॅटोची लागवड केली. या पिकानंतर उन्हाळी हंगामात चवळी पीक घेण्याचा निर्णय घेतला.  कमी उत्पादन खर्च व बाजारपेठेत असलेली मागणी या बाबींच्या आधारे या पिकात जम बसू लागला. अनुभव येत गेला तसतसे संतोष या पिकाच्या व्यवस्थापनात कुशल होत गेले. आज या पिकात त्यांनी हुकमत तयार केली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. 

कुटुंबाची भक्कम साथ 
वडिलांच्या निधनानंतर संतोष यांना आई छायाबाई यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत असते. त्या काळात मॅट्रिक झालेल्या छायाबाई अभ्यासू व प्रयोगशील आहेत. शेतीविषयक अभ्यास व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी त्या आग्रही असतात. शेतीची जबाबदारी असताना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. पत्नी सौ. सुनीता पिंपळगाव गरुडेश्वरच्या पोलिस पाटील आहेत. त्यांचीही समर्थ साथ मिळते. हृतिक व अनिकेत या मुलांचीही मदत होते. संतोष शेती सांभाळून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.

मुंबई बाजारपेठ विक्रीचा उत्तम पर्याय  
हिरव्या (कोवळी) चवळीला वाशी (मुंबई) मार्केटमध्ये चांगली मागणी असते. स्थानिक वाहतुकीच्याा माध्यमातून माल पाठवला जातो. प्रत्येक गोणीमागे ८० रुपये खर्च होतो. मालाचे वजन झाल्यानंतर पेमेंट रोख किंवा ‘ऑनलाइन’ केले जाते. व्यापाऱ्यांत संतोष यांच्या चवळीची चांगली ओळख तयार झाल्याने हंगामात आगाऊ मागणी केली जाते. त्यामुळे व्यापारी व बाजारपेठ निश्चित असल्याने विक्रीव्यवस्था उभी राहिली आहे.

हाताळणी, प्रतवारीमुळे अधिक दर 
तोडलेली चवळी एके ठिकाणी जमा केली जाते. प्रतवारीनुसार दर ठरत असतो. कवळी, मध्यम व पक्व अशा तीन पद्धतीत प्रतवारी होते. त्यानंतर बंडल्स करून रबराच्या साह्याने ते बांधले जातात. ते ५० किलो वजनाच्या गोणीत व्यवस्थित भरले जातात. त्यामुळे गुणवत्ता व व्यापाऱ्यांची मागणी टिकून राहिल्याने मालाला अधिक पसंदी मिळते.

अन्य पिकांची लागवड : टोमॅटो, कोबी, गवार, वांगी, मिरची आदी पिकेही बाजारपेठेचा अंदाज घेऊन केली जातात. त्यामुळे हंगामनिहाय पिकांचे आगाऊ नियोजन करण्यावर भर असतो. खरिपात भाताचीही लागवड असते. 

संतोष यांच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये 
  कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड
  शेतीच्या अचूक नोंदी, त्यानुसार खर्चाचे नियोजन व गुंतवणूक
  व्यक्तिनिहाय शेतीकामाच्या जबाबदाऱ्या निश्चित
  बहुतेक सर्व अवजारांची उपलब्धता. घरच्या घरी मशागतीची कामे
  रासायनिक खते व कीडनाशकांचा गरजेनुसार वापर
  मालाची हाताळणी व प्रतवारी
  बाजाराची गरज व मागणीनुसार मालाचा पुरवठा

मिळणारे दर : 
प्रतिकिलो ८ ते ९ रुपये, कमाल- १२ रुपये
खर्च जाऊन मिळणारा दर : ५ रुपये 

   संतोष पालखेडे,९८५०४९०६२८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT