s r timber order to release water to jayakwadi 8 tmc dam water drought water crisis shirdi
s r timber order to release water to jayakwadi 8 tmc dam water drought water crisis shirdi  sakal
अहमदनगर

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी साडेआठ टीएमसी पाणी सोडा - सं. रा. तिरमनवार

सतीश वैजापूरकर

शिर्डी : दारणा, गंगापूर, भंडारदरा आणि मुळा धरण समूहातून एकूण साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश आज गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांनी जारी केले. दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असलेल्या या धरण समूहांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा आदेश दुष्काळात तेरावा महिना ठरेल. पाणीतुटीमुळे आधीच जेरीस आलेल्या गोदावरी कालव्यांच्या सुमारे एक लाख एकर लाभक्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

या कालव्यांचे तब्बल तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडावे लागेल. त्यामुळे पुढील आठ महिन्यांत गोदावरी कालव्यातून जेमतेम अडीच ते तीन आवर्तने झाली, तरी नशीब अशी चिंताजनक स्थिती निर्माण होईल. आता गोदावरी नदीपात्रातील चौदा, प्रवरा नदीवरील बारा आणि मुळा नदीवरील चार बंधारे आता रिकामे करावे लागतील.

त्यानंतर जायकवाडीकडे पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे बंधारे सध्या आहेत, त्या स्थितीत पुन्हा भरून द्यावे लागतील. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होईल. दारणा धरण समूहातून अडीच टीएमसी, गंगापूर धरण समूहातून अर्धा टीएमसी पाणी सोडले जाईल. उघड्या नदीपात्रातून तब्बल १७५ किलोमीटर अंतराचा प्रवास करून हे पाणी जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जाईल.

एवढ्या मोठ्या प्रवासात पाणी किती वाया जाईल याची कल्पना न केलेली बरी. गंगापूर धरण समूहात गंगापूरसह कश्यपी, गौतमी व गोदावरी ही छोटी धरणे, तर दारणा समूहात दारणासह आळंदी, कडवा, भावली, भाम, वाकी व मुकणे ही धरणे येतात. या धरणांचे पाणी एकत्र करताना पाणीनाश होईल तो आणखी वेगळा असेल.

भंडारदरा धरण समूहात भंडारदयासह निळवंडे, आढळा व भोजापूर या धरणांचा समावेश आहे. या समूहातून साडेतीन टीएमसी पाणी सोडले जाईल. मुळा धरण समूहात मुळासह मांडओहोळ धरणाचा समावेश आहे. मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडले जाईल. तुलनेत हे दोन्ही धरण समूह जायकवाडीच्या जवळ आहेत. मुळा समूह केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून प्रत्यक्ष पाणी सोडण्यास सुरुवात होईल. मुळा, प्रवरा व गोदावरी नदीपात्रातून पाणी वहात असताना शेजारच्या गावांचा वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. पाणी उचल थांबविण्यासाठी गरज भासल्यास पोलिसांची मदत घेतली जाईल.

जायकवाडीत साडे आठ टीएमसी पाणी सोडताना तीस टक्के पाणीनाश होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत हा पाणीनाश परवडणार आहे का? यापूर्वी जायकवाडीच्या अचल साठ्यातून आठ टएमसी पाणी वापरण्यात आले होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत या पर्यायाचा विचार का करण्यात आला नाही? हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी शिष्टमंडळे नेऊन गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली. जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.

मुळात नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना या समस्येची फारशी निकड जाणवत नाही. नगर जिल्ह्यात सर्वाधिक फटका फक्त गोदावरी कालव्यांना बसतो. हे वास्तव गोदावरी कालव्यांच्या मुळावर आले आहे. विशेष म्हणजे अपवाद वगळता सध्या या समस्येशी निगडित सर्वच लोकप्रतिनीधी सत्ताधारी पक्षाचे आहेत. सारा गाव मामाचा, अन् एक नाही कामाचा.. अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गोदावरी नदीतून यंदा दुष्काळ असताना देखील २१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले, तरीही दारणा व गंगापूर धरण समूहातून तब्बल तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाईल. या उलट मागील वर्षी साडेपाच टीएमसी पाणी शिल्लक असलेल्या आणि यंदा केवळ तीन टीएमसी पाणी जायकवाडीत गेलेल्या भंडारदरा धरण समूहातून मात्र फक्त तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाईल.

यंदा मुळा धरणातून जायकवाडीत थेंबभर पाणी गेले नाही. या धरणातून दोन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाईल. दारणा व गंगापूर धरण समूहाला त्याचा अर्थातच सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे या समूहातील शेती आणखी धोक्यात येईल. मात्र, सिंचन कायदा किंवा मेंढेगिरी समिती या दोघांनीही या तफावतीचा विचार केलेला नाही. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रावर त्यामुळे अन्याय होतो.

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली मात्र लाभक्षेत्रात दुष्काळ आहे. मागील वर्षी भंडारदरा आणि निळवंडे मिळून साडेपाच टीएमसी पाणी शिल्लक होते ही बाब लक्षात घेण्यात आली नाही. शिवाय कायद्यात अशी बाब लक्षात घेण्याची तरतूद करण्यात आली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्याचे सर्वाधिक नुकसान होईल.

-उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT