‘अर्थ’बोध : ‘इट्स प्रॉबेब्ली ओव्हरप्राइस्ड!’
‘अर्थ’बोध : ‘इट्स प्रॉबेब्ली ओव्हरप्राइस्ड!’ sakal media
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : ‘इट्स प्रॉबेब्ली ओव्हरप्राइस्ड!’

अतुल सुळे (बॅंकिंग क्षेत्राचे अभ्यासक)

सन २०२१ हे प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) गेल्या दशकातील उत्कृष्ट वर्ष ठरले. जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत ५३ कंपन्यांनी बाजारातून १.०८ लाख कोटी रुपये उभे केले, त्यापैकी ३८ कंपन्यांचे भाव ‘आयपीओ’च्या भावापेक्षा जास्त, तर १५ कंपन्यांचे भाव त्यापेक्षा कमी झालेले दिसतात. झोमॅटो, नजारा टेक्नॉलॉजीज, पारस डिफेन्स या कंपन्यांचे भाव ‘आयपीओ’च्या भावाच्या दुप्पट झाले, तर पेटीएम, कार ट्रेड, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सारख्या काही कंपन्यांचे सध्याचे भाव ‘आयपीओ प्राईस’च्या खाली आलेले आहेत. याचाच अर्थ, बाजारात येणाऱ्या प्रत्येक ‘आयपीओ’ला लॉटरीचे तिकीट समजून अर्ज करून नशीब आजमावणे चुकीचे ठरेल.

‘इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ या बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या उत्कृष्ट पुस्तकात, गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी, ‘आयपीओ’ या शब्दाचे तीन नवे फुल फॉर्म दिले आहेत ते असे -

१) इट्स प्रॉबेब्ली ओव्हरप्राईस्ड, २) इमॅजिनरी प्रॉफिट्स ओन्ली, ३) इन्सायडर्स प्रायव्हेट अपॉर्च्युनिटी

एक साधा प्रश्न सूज्ञ गुंतवणूकदारांनी स्वतःलाच विचारायला पाहिजे, की शेअर बाजारात मंदी असताना ‘आयपीओ’ बाजारात का येत नाहीत आणि बाजारात तेजी असतानाच ‘आयपीओं’ची रांग का लागते?

या प्रश्नाचे सोपे उत्तर असे, की कंपनीचे संस्थापक, प्रायव्हेट इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, ज्यांनी कंपनी नावारुपाला आणण्यासाठी कष्ट आणि जोखीम पत्करलेली असते, त्यांना कंपनीचा शेअर जास्तीत जास्त भावाला विकून जास्तीत जास्त नफा कमवायचा असतो आणि अशी संधी तेजीमध्येच मिळते! ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) या नावाने ही मंडळी भरपूर नफा कमवून घेतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो, की ‘आयपीओ’मध्ये शेअर खरेदी करताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अतिशय दक्षता बाळगली पाहिजे; कारण भाव जास्त असण्याची शक्यताच जास्त असते.

जेव्हा कंपनी प्रथमच भांडवली बाजारातून पैसे जमा करते, त्याला ‘आयपीओ’ असे म्हणतात व हे ‘आयपीओ’ दोन प्रकारचे असतात - फिक्स्ड प्राइस आणि बुक बिल्डिंग. पहिल्या प्रकारात ‘आयपीओ’चा भाव हा इश्यु सुरू होण्याच्या आधीच ठरविण्यात येतो, तर दुसऱ्या प्रकारात वेगवेगळ्या किमतीला असणाऱ्या मागणीनुसार भाव हा इश्यु पूर्ण झाल्यानंतर ठरविण्यात येतो. या प्रकारात एक किंमतपट्टा ठरविण्यात येतो व गुंतवणूकदार वेगवेगळ्या किमतीला लिलावाप्रमाणे बोली लावतात. ज्या किंमतीला जास्तीत जास्त मागणी असते, तो ‘आयपीओ’चा भाव ठरतो.

‘आयपीओ’चा भाव कोणाच्या हातात?

आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो, की ‘आयपीओ’चा भाव किंवा किंमतपट्टा कोण ठरविते? यासाठी आपल्याला थोडे मागे डोकावून बघावे लागेल. १९४७ ते १९९१ या चार दशकांपेक्षा अधिकच्या काळात कंपन्यांनी कोणत्या भावाला, किती व कधी भांडवल उभे करावे, हे ‘कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज’ ठरवत असत. परंतु, जागतिकीकरणाच्या रेट्यात ऑगस्ट १९९१ मध्ये हे ऑफिस बंद करण्यात आले आणि एप्रिल १९९२ मध्ये ‘सेबी’ची स्थापना करण्यात आली. ‘सेबी’ला कंपन्यांचे ‘ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) तपासण्याचा अधिकार देण्यात आला. परंतु, ‘आयपीओ’चा भाव ठरविण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. आता कंपनी व कंपनीचे मर्चंट बँकर (इन्व्हेस्टमेंट बँकर) मिळून भाव ठरवू शकत होते. या सवलतीचा गैरफायदा घेऊन अनेक कंपन्यांनी चढ्या भावाला ‘आयपीओ’ आणण्यास सुरवात केली. छोट्या गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी ‘सेबी’ने दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक तर त्यांच्या गुंतवणुकीवर दोन लाख रुपयांची मर्यादा घातली आणि बुक बिल्डिंगमध्ये छोट्या गुंतवणूकदारांचा कोटा १५ टक्के ठेवला. फिक्स्ड प्राइस इश्युमध्ये हा हिस्सा ५० टक्के असतो.

‘बायर बिवेअर’ तत्त्व लागू

एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा छोट्या गुंतवणूकदारांनी समजून घेणे गरजेचे वाटते, की कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ‘बायर बिवेअर’ हे तत्त्व लागू होते. तेच तत्त्व शेअर खरेदी करताना सुद्धा लागू होते. तसेच मूल्य आणि किंमत यातील फरक सुद्धा समजून घेणे अत्यावश्यक असते. किंमत आपण अदा करतो, तर मूल्य आपल्याला मिळते. ‘आयपीओ’ची किंमत सर्वांनाच माहिती असते; पण मूल्य मात्र अभ्यासपूर्वक ठरवावे लागते. सर्वसामान्यत: प्राईस अर्निंग्ज रेशो, म्हणजेच कंपनी एका शेअरमागे जो नफा कमवीत आहे, त्याच्या किती पट भाव आहे, ते बघितले जाते. जितका पीई रेशो कमी, तितका गुंतवणूकवाढीला वाव जास्त! परंतु, सध्या बाजारात येणाऱ्या अनेक कंपन्या तोट्यात आहेत व त्यामुळे त्यांचा ‘पीई रेशो’च काढता येत नाही. अशावेळी जास्त भाव मिळविण्यासाठी ‘प्राईस टू सेल्स’सारखे नवे रेशो गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी वापरले जातात. गुंतवणूकदारांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे.

‘डीआरएचपी’ दस्तऐवज महत्त्वाचा

कोणत्या ‘आयपीओ’साठी अर्ज करायचा व कोणता सोडून द्यायचा, हे ठरविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दस्तेऐवज म्हणजे ‘ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस’ अर्थात ‘डीआरएचपी’! हा सुज्ञ गुंतवणूकदारांसाठी माहितीचा खजिनाच असतो. कंपनीची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप, भवितव्य, प्रवर्तकांचा अनुभव, जमवलेल्या पैशांचे काय करणार, भाव कसा ठरविला, संबंधित क्षेत्रातील कंपन्यांची तुलना व गुंतवणुकीतील जोखीम यांचे सविस्तर वर्णन यात दिलेले असते. तुम्ही जर दीर्घ मुदतीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर याचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. परंतु, तुम्ही केवळ ‘लिस्टिंग’च्या वेळच्या नफ्यासाठी अर्ज करणार असाल, तर ‘कभी खुशी, कभी गम’ची तयारी ठेवायला हवी!

(लेखक शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT