तात्या लांडगे
सोलापूर : औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), डी-फार्मसी, वास्तुशास्त्र, बीसीए, बीबीए, एचएमसीटी, बीएमस, बीबीएम, अभिकल्प या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. ४ ते १३ जुलै या मुदतीत विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार असून, त्यावेळी विद्यार्थ्यांना कागदपत्रे देखील अपलोड करावे लागणार आहेत.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले, तरीपण फार्मसीसह अन्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरवात झालेली नव्हती. त्यावर ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. आता सीईटी सेलने फार्मसीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना www.mahacet.org या संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहेत. प्रवेश अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.
दरम्यान, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ‘सीईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आरक्षण लागू राहील. पण, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून त्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. पहिली गुणवत्ता यादी २१ जुलैला प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर आठ दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागतील.
प्रवेशाचे वेळापत्रक असे...
अर्ज करण्याची मुदत
४ ते १३ जुलै
अर्जाची पडताळणी
५ ते १४ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी
१६ जुलै
हरकती, आक्षेप नोंदवणे
१७ ते १९ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी
२१ जुलै