नवी दिल्ली : अमेरिकी पतमानांकन संस्था "मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या विकासदराचा अंदाज कमी केला आहे. 2019 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5.8 टक्क्याचा जीडीपी गाठेल, असा अंदाज मूडीजने वर्तवला होता. मात्र, ताज्या आर्थिक आढाव्यानुसार, मूडीजने यंदा विकासदर 5.6 टक्के राहील, असा नवा अंदाज वर्तवला आहे. नुकतेच मूडीजने भारताचे पतमानांकन "स्थिर'वरून "नकारात्मक' केले होते.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर (जीडीपी) पाच टक्क्यांपर्यंत खाली आला. देशांतर्गत मागणी आणि खप कमी झाल्याने विकासाला झळ बसली आहे. चालू वर्षात वित्तीय तूट "जीडीपी'च्या 3.7 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला होता. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आली नाही, तर मानांकन वृद्धी अशक्य आहे, असेही या संस्थेने स्पष्ट केले होते. कंपनी करातील कपातीने सरकारच्या कर महसुलावर परिणाम होईल, असे मूडीजने म्हटले आहे.
"मूडीज'च्या दाव्यानुसार, चालू वर्षात विकासदर 5.8 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांपर्यंत घसरेल. गेल्या आर्थिक वर्षात (2018) देशाचा विकासदर 7.4 टक्क्यांवर होता. सेवा क्षेत्रातील मंदीचे वातावरण, गुंतवणुकीत झालेली घट आणि वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्याने ही मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2020 आणि 2021 मध्ये जीडीपीचा दर अनुक्रमे 6.6 आणि 6.7 टक्के राहण्याची अपेक्षा होती. मात्र, विकासाची गती पूर्वीच्या तुलनेत कमी राहील. वास्तविक वृद्धीचा दर (रिअल जीडीपी) दर 2019 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आठ टक्क्यांवरून कमी होऊन पाच टक्क्यांवर आला आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
"मूडीज'च्या मते, देशात अनिश्चिततेच्या काळाचा गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाले होते. सद्यपरिस्थितीत देशांतर्गत मागणीत घट झाल्याने अर्थव्यवस्थेच्या वाढीला "ब्रेक' लागला आहे, असे मत "मूडीज'ने व्यक्त केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.