मे महिन्यातला एक दिवस.
ट्रॅक्टरवाल्या भाऊसाहेबाचा फोन आला म्हणून काम पूर्ण झालं का नाही, हे पाहण्यासाठी अशोकनं लगोलग रानाकडं जायचं ठरवलं. भाकरी खाऊन जा, असं म्हणणाऱ्या आईला हातानंच थांबण्याचा इशारा करीत अशोकनं त्याची ‘पॅशन’ काढली अन् निगाला शेताकडे. भाऊसाहेबानं सांगितल्याप्रमाणे सगळ्या रानात पाळी मारून शेत कसं काळंभोर करून टाकलं होतं. दोघंही बराच वेळ उन्हात इकडून तिकडं फेऱ्या मारत होते. अशोकला मशागतीचं काम पूर्ण झाल्याचं समाधान वाटलं. अशोकभाऊ, आता पुढल्या बारीला पेरणीच्या टायमाला सांगा, असं म्हणून भाऊसाहेबानं पैशाची गोष्ट काढली. भाऊसाहेबाच्या पेमेंटचं जुगाड अशोकनं कसंतरी इकडून-तिकडून करून केलं होतं. त्यामुळे त्यांच्या हाती पैसे ठेवून अशोक म्हणाला, पुढल्या टायमाला काही कमीजास्त झालं तर करून घ्या अॅडजेस... भरउन्हात पुन्हा रिटर्न अशोक घरी आला.
साधारण एप्रिल-मे महिन्यात गावखेड्यात सगळीकडेच असे अशोक आणि भाऊसाहेब असतात. मृगाची पेरणी साधण्यासाठी आपण तय्यार असलेलं बरं, या विचारानं काळ्या आईच्या सेवेत राबणाऱ्या या हजारो हातांमध्ये निसर्गानं संपूर्ण जगाला पोसण्याची ताकद बहाल केलीय. रखरखत्या उन्हातही या बळिराजाचे डोळे आभाळाकडे पाहत असतात. हे झालं साधारण मे महिन्यातलं.
गावात येणाऱ्या पेपरमधल्या बातम्या, टीव्हीवर सांगितल्या जाणाऱ्या अंदाजानुसार पाऊस केव्हा येईल, याची चर्चा पारावर सुरू असते. सगळ्यांचं म्हणणं एकच - टायमावर यायला हवा गड्या! पावसाबद्दल हवामान खात्यानं दिलेला अंदाज बरेचदा खराही ठरतो, तसा अनेकदा तो हुकूनही जातो. हा अनुभव मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अनेकदा आलाय. त्यामुळे हे वरुणराजा, यंदा मात्र तू हे अंदाज खरे ठरवले आणि धो धो बरसलास.
संपूर्ण वर्षाला बरोब्बर अर्ध्यातून मोडणारा हा जून महिना सहावा. पण याच महिन्यात निसर्गाच्या चक्राला नव्याने सुरवात होते. रणरणत्या उन्हात तप्त तापलेल्या धरित्रीला जशी पावसाची ओढ असते, तशी ती भूतलावरच्या प्रत्येक जिवाला असते. पण हे वरुणराजा, तुझ्या येण्याची वाट पाहण्यात कधी कधी जुलै महिनाही निघून जायचा. तू तर यायचाच नाही, मात्र तुझ्या येण्याविषयी नुसत्या नवनवीन तारखा येत राहायच्या.
यंदाच्या वर्षी मात्र अगदी सुरवातीपासूनच धो धो पाऊस बरसतोय. गावाच्या फाट्यावरून नेहमी दिसणारा कोरडाठाक ओढा आताच खळाळून वाहतोय. तुझ्या या जादूने बळिराजाही खुशीत दिसतोय. रान तर त्यानं केव्हाच तय्यार करून ठेवलंय. आता सगळीकडंच लगबग सुरू आहे ती पेरणीची. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग अन् बरेच काही. कपाशी टोचून लावण्यासाठी काळ्याभोर शेतात शेतकऱ्यासह त्याचे नातलगही जमतात. सगळीकडचे शेतकरी आपापल्या ऐपतीनुसार कशीबशी पेरणी उरकून घेत आहेत. येत्या काही दिवसांत एका रेषेत सगळ्या वावरात हिरवी अंकुरलेली कपाशी दिसू लागेल. उसाची रानंही हिरवीगार दिसू लागतील. आपल्यासारख्या अनेकांना पोटभर खाऊ घालणाऱ्या या शेतकऱ्यांना वरुणराजा तूही नक्कीच साथ देशील.
आपलं आणि पावसाचं नातंही वेगवेगळं असतं बघा. पावसाचं एक सुखद चित्र प्रत्येकाच्या मनात असतं. पडणारा पाऊस कुणाला घराच्या खिडकीतून पाहायला आवडतो, तर कुणाला थेट पावसात चिंब भिजून. आॅफिसातले काम संपवून घराच्या ओढीने निघालेल्या नोकरदाराला जायच्या वेळी आलेला पाऊस बरेचदा रुचत नाही, तर हिलस्टेशनकडे निघालेल्या न्यूली मॅरीड जोडप्याला रस्त्यात पावसाने गाठलं तर त्यांच्या उत्साहात हा पाऊस नक्कीच भर घालत असतो. उघड्यावर पालं टाकून राहणाऱ्या कष्टकरी वर्गाची तारांबळ कधी हा पाऊस करतो, तर कधी शाळेत जायला कंटाळा करणाऱ्या पिंट्याला पाऊस आला की घरी थांबायचं आयतंच कारण मिळतं. त्यामुळे पाऊस कसा, तर तुम्ही घ्याल तसा. पावसाचं हे चित्र ज्यानं त्यानं मनात रेखाटलेलं असतं. अवघ्या सृष्टीला हिरव्या शालूची भेट देणाऱ्या या वरुणराजावरचं प्रेम मात्र तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या मनात सारखंच असतं.
पावसात निथळणाऱ्या झाडांकडे, खळखळून वाहणाऱ्या ओढ्याकडे, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकडे आणि समोरच्या झाडावर पावसात चिंब भिजलेल्या चिमण्यांकडे पाहून तुम्हा सर्वांना आभाळ भरून शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.