mehmud
mehmud 
Blog | ब्लॉग

वेडा महमूद दरवाजा! 

संकेत कुलकर्णी

काल घडली तशीच एक घटना 1990 मध्ये घडली होती. औरंगाबाद टेक्‍स्टाईल मिलजवळील बारापुल्ला दरवाजाचे कवाड छावणीकडे जाणाऱ्या सिटीबसवरच कोसळले होते. त्यातही बहुतेक कुणी जखमी झाले नसावे; पण नंतर ते दार पूर्ववत न बसवल्यामुळे कुठे गायब झाले, ते कुणालाच कळाले नाही. आज घडलेली घटना ही त्याचीच जशीच्या तशी पुनरावृत्ती. फक्त आज रहदारी सुरू असूनही नेमके त्या वेळी दरवाजात कुणी नव्हते. परवा रात्री झालेल्या पावसाचे पाणी साचून दरवाजाचा पट रुतलेल्या मातीत ओल निर्माण झाली. त्यात वर्षानुवर्षे कुजलेला सागवानी पट सकाळी धुऱ्यातून सरकला आणि निखळून पडला. याच दरवाजाचा दुसरा पटही तसाच कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

शहरातील अनेक दरवाजांचे लाकडी पट असेच लोकांनी चोरले किंवा फोडून सरपणाला वापरले. हत्तींनी धडक देऊन फोडू नये, म्हणून पूर्वीच्या राजांनी त्यावर अणकुचिदार लोखंडी सुळे ठोकले होते; पण आपलेच वारसदार ते फोडून जळणाला वापरतील, हे त्यांना काय माहीत! वेळेवर दुरुस्ती, संवर्धन न झाल्यामुळे, पुरेशी जपणूक न केल्यामुळे शहरातील एकेक दरवाजा नामशेष होत गेला. धोकादायक स्थितीत असल्याचा कांगावा करत गणेश कॉलनीतील खुनी दरवाजा पाडण्यास काही वर्षांपूर्वी महापालिकेला भाग पाडण्यात आले होते. पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनीही संवर्धनाची कुठलीच शक्‍यता न पडताळता थेट बुलडोझर चालवून दरवाजा पाडून टाकला. गेल्या वर्षी जिन्सीतील खासगेट रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रातोरात पाडून टाकले. 

काही वर्षांपूर्वी "इन्टॅक'च्या मदतीने चार दरवाजांचे संवर्धन करण्यात आले होते. रोशन गेट परिसरातही सुशोभिकरण करून वाहतूक बेट बनवले होते. नागरिकांनी आत घाण करून त्याचीही वाट लावली. आज रंगीन दरवाजा, रोशनगेट, जाफरगेट, छोटी भडकल, खिजरी गेट अशा काही दरवाजांना दारू पिण्याचे अड्डे, कचरा टाकण्याच्या जागा, भंगार साठवण्याच्या गोदामांचे रुप आले आहे. केवळ आत पोलिस चौकी आहे, म्हणून पैठणगेटला अजून कुणी जास्त उपद्रव केला नाही. पण कचराकोंडीच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच कचरा गोळा करून पैठणगेटमध्ये साठवला. 

काल दुर्घटना घडलेल्या महमूद दरवाजाबरोबरच मकाई गेट आणि बारापुल्ला दरवाजाची समस्या सारखीच आहे. खाम नदी ओलांडून पाणचक्की, बेगमपुरा आणि छावणीकडे जाण्यासाठी त्या काळी या दरवाजांपुढे पूल उभारण्यात आले होते. तेव्हा घोडे, टांगे, बैलगाड्या किंवा फारतर एखादे वेळी हत्ती यावरून जात असे. त्यापेक्षा अवजड वाहतूक कधी झाली नाही; पण आता गेली पन्नास-साठ वर्षे याच पुलांवरून वाहनांची अखंड वर्दळ आहे. गेल्या दोन-तीन दशकांत मोठाल्या बस, ट्रकची रहदारी येथून वाढली. तेही सहन करण्याची शक्ती या पुलांमध्ये अजून कायम आहे; परंतु लोकसंख्येच्या वाढत्या लोंढ्यांना सहन करण्याची त्यांची पात्रता संपली आहे. या दरवाजांशिवाय आजूबाजूने पर्यायी रस्ते काढण्याची, नव्या पुलांची कागदावरील योजना कुणीही कधीच पुढे रेटली नाही. त्यामुळे रोज ट्राफिक जाम होते. अत्यवस्थ रुग्ण घेऊन घाटीकडे धावणाऱ्या रुग्णवाहिकांना कित्येकदा अरुंद महमूद दरवाजात अडकून पडावे लागते. 

एक गंमत - 
पाठीत उसण भरलेल्या माणसाने मकाई दरवाजाच्या मजबूत पोलादी कड्या पाठीवर घासल्या तर त्याला बरे वाटते, अशी इथल्या लोकांची अंधश्रद्धा आहे. त्याखेरीज दरवाजांवर पूर्वी नवसाच्या नाल ठोकण्याचेही प्रकार होत. अशा नाल ठोकून रहिवाशांनी दरवाजाचे पट भरून टाकले. त्यांच्या नवसाला हे दरवाजे एकवेळ पावले असतील; पण या दरवाजांना महापालिका किती पावते हे पाहणे, म्हणजे अमावस्येला चंद्र उगवण्याची वाट पाहण्यासारखे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT