देश

25-23 सूत्र ठरले?; यवतमाळ आणि पुणे काँग्रेसकडेच

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 25 जागा काँग्रेसला आणि 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असे सूत्र ठरल्याचे काँग्रेसच्या राज्यपातळीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. यवतमाळ आणि पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील. समविचारी पक्षांना आपापल्या कोट्यातून दोन्ही पक्ष जागा सोडतील, असेही या सूत्रांचे सांगणे आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत दुजोरा दिलेला नाही. 

महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोचली आहे. राज्यात 20 - 20 जागांच्या वाटपावर दोन्ही पक्ष सहमत असले, तरी आठ जागांचा तिढा कायम आहे. काही जागांवर दोन्ही पक्षांकडून होणारे दावे, अदलाबदल करावयाच्या जागा, तसेच अन्य मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागा या कळीच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसांत तोडगा निघेल असे कळते. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज दिल्लीत बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रामुख्याने "महाराष्ट्रातील जागावाटप' हाच बैठकीचा केंद्रबिंदू होता. जागावाटपाच्या सूत्रावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परस्परविरोधी दाव्यांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वमान्य तोडगा निघावा यावर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. कॉंग्रेसचे सरचिटणीस व राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते. पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. 

लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पक्ष 20 - 20 जागांवर लढण्यासाठी सहमत आहेत. मात्र, यामध्ये मतदारसंघांची अदलाबदलदेखील प्रस्तावित असल्याचे कळते. यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, नंदुरबार, रावेर, नगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या आठ जागांवर दोन्ही पक्षांची रस्सीखेच आहे. शिवाय, हा तिढा सोडविण्यासाठी काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामध्ये भिवंडी, औरंगाबाद, जालना हे मतदारसंघ विचाराधीन असल्याचे समजते. नगरसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील विशेष आग्रही आहेत; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगर कोणत्याही परिस्थितीत आपल्याचकडे राहील असे स्पष्ट केले आहे. याखेरीज भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी डावे पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि शक्‍य झाल्यास प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य समविचारी पक्षांना कशा प्रकारे या आघाडीत सामावून घेता येईल, त्यासाठी किती जागा सोडाव्या लागतील, त्या जागा कोणत्या पक्षाच्या हिश्‍शातील असतील, याचा पेच अजूनही सुटलेला नाही. 

त्यापार्श्‍वभूमीवर पवार- राहुल बैठकीबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी "सकाळ'ला सांगितले, की शिल्लक जागांच्या वाटपावर मी आणि मल्लिकार्जुन खर्गे चर्चा करणार आहे. मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडणे, मतदारसंघांची अदलाबदल यावर आपापल्या पक्षांच्या राज्यपातळीवरील नेत्यांशी बोलून ठरविले जाईल. 

दरम्यान, जागावाटपाच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य कॉंग्रेसचे नेतेदेखील आज दिल्लीत पोचले होते. या नेत्यांचेही बैठकसत्र दिवसभर सुरू होते. पवार- राहुल बैठकीपूर्वी प्रदेश पातळीवरील नेत्यांची बैठक प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानीही एक छोटेखानी बैठक होऊन पुन्हा एक बैठक मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत रात्री उशिरा झाली. त्याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना 15 जानेवारीला मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT