नवी दिल्ली : ''निवडणुकीपूर्वी आरोप करण्याचा हा अजेंडा असण्याची शक्यता आहे. #MeToo सारखे माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपांमुळे माझी प्रतिमा मलीन झाली आहे. अशाप्रकारे माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या महिलांवर मी कायदेशीर कारवाई करणार आहे'', अशा शब्दांत परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावरील आरोप आज (रविवार) खोडून काढले.
#MeToo या मोहिमेंतर्गत महिलांवरील लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री अकबर यांच्यावर काही महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर देशभरातून ही मोहीम अधिक तीव्र झाली असून, विविध क्षेत्रातील महिला ज्या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या, त्या महिला पुढे येत आहेत. या आरोपानंतर परदेश दौऱ्यावर असलेले अकबर यांना परदेश दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्यास सांगितले होते. त्यानंतर आज ते भारतात परतल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, ''माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलांवर मी कायदेशीर कारवाई करणार आहे''.
दरम्यान, अकबर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.