नवी दिल्ली : ‘‘शांततेचा काळ हा केवळ एक ‘भ्रम’ असून, तुलनेने शांततेच्या काळातसुद्धा भारताने अनिश्चिततेसाठी सज्ज राहिले पाहिजे,’’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी सशस्त्र दलांचे संरक्षण लेखा विभागाच्या परिषदेत कौतुक करताना ते बोलत होते.
कार्यक्रमात भाषण करताना सिंह म्हणाले, ‘‘ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी बनावटीच्या उपकरणे वापरल्याने भारतात तयार होणाऱ्या लष्करी उत्पादनांची जागतिक मागणी वाढली आहे. संपूर्ण जग आपल्या संरक्षण क्षेत्राकडे अतिशय आदराने पाहत आहे. आर्थिक प्रक्रियांमधील एकच विलंब किंवा चूक थेट कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते.
यापूर्वी जी लष्करी उपकरणे आपण आयात करीत होतो, आता ती आपण स्वतः तयार करतो. आपले ध्येय अचूक असल्यामुळे आपण केलेले प्रयोग यशस्वी होत आहेत. सरकारची भूमिका ठाम असल्यानेच हे शक्य होत आहे. आर्थिक प्रक्रियांमधील विलंब किंवा चूक थेट कार्यक्षमतेवर परिणाम करणारी ठरते. संरक्षण लेखा विभागाने संरक्षण क्षेत्रातील खासगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रक या भूमिकेतून पुरवठादार या भूमिकेकडे वळावे, असे वाटते.’’
मोठ्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करताना संरक्षणमंत्र्यांनी ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालाचा हवाला दिला.‘‘सन २०२४ मध्ये जागतिक लष्करी खर्च २.७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यामुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगांसाठी प्रचंड संधी खुल्या होतील. वेगाने विकसित होत असलेल्या संरक्षण वातावरणात कायम दक्ष राहणे आवश्यक असून, त्यातूनच कार्यसंस्कृती अधिक सक्षम होणार आहे. केवळ बाह्य लेखापरीक्षण किंवा सल्लागारांवर अवलंबून राहण्याऐवजी आत्मपरीक्षणाद्वारे अंतर्गत सुधारणा करण्याची गरज आहे,’’ असे ते म्हणाले.
राजनाथ पुढे म्हणाले, ‘‘अंतर्गत मूल्यांकनाद्वारे केलेल्या सुधारणांमुळे संस्था अधिक सक्षम होते. शांततेचा काळ हा एक भ्रम आहे. शांततेच्या काळातही संकटाविरोधात लढण्यासाठी आपण कायम तयार असले पाहिजे. अचानक घडणाऱ्या घडामोडींमुळे कामकाजाच्या स्थितीत पूर्णपणे बदल होऊ शकतो. उपकरणांचे उत्पादन वाढवणे असो किंवा आर्थिक प्रक्रियांशी जुळवून घेणे असो, आपण नेहमीच नावीन्यपूर्ण तंत्रासाठी तयार असले पाहिजे. निर्णयक्षमता, नियोजन आणि आर्थिक स्रोतांची जुळवणी अशा विविध गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.’’
सर्व देश पुन्हा शस्त्रसज्ज होऊ लागले आहेत. यावेळी भारतही संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे. संरक्षण क्षेत्रासाठी हा काळ महत्त्वाचा आहे.
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.